'मॅग्मा फिनकॉर्प' लवकरच पूनावालांच्या ताब्यात - adar poonawala will take controlling stake in magma fincorp | Politics Marathi News - Sarkarnama

'मॅग्मा फिनकॉर्प' लवकरच पूनावालांच्या ताब्यात

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

नियामकांच्या मान्यतेनंतर महत्त्वपूर्ण व्यवहाराची होणार पूर्तता 

मुंबई : बिगर-बँकिंग वित्त कंपनीतील (एनबीएफसी) आघाडी कंपनी 'मॅग्मा फिनकॉर्प लि.'मधील नियंत्रणाएवढा मोठा हिस्सा (कंट्रोलिंग स्टेक) लवकरच अदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील 'रायझिंग सन होल्डिंग्ज' या कंपनीच्या ताब्यात येणार आहे. ही वित्तीय क्षेत्रातील एक महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. 'मॅग्मा फिनकॉर्प'ला पूनावालांकडून भक्कम पाठबळ मिळणार असून, त्यात मोठी भांडवली गुंतवणूकही केली जाणार आहे. याबाबतची घोषणा आज करण्यात आली. 

या प्रेफरन्शियल ॲलॉटमेंटनंतर 'रायझिंग सन होल्डिंग्ज' ही 'मॅग्मा फिनकॉर्प'ची प्रवर्तक बनणार आहे. या व्यवहाराला नियामकांची मान्यता मिळाल्यानंतर 'मॅग्मा फिनकॉर्प' आणि तिच्या उपकंपन्यांचे 'पूनावाला फायनान्स' या 'ब्रँडनेम'खाली नामकरण होणार आहे. तसेच, 'पूनावाला फायनान्स'च्या वित्तीय सेवा व्यवसायाचे नियमानुसार 'मॅग्मा फिनकॉर्प'मध्ये एकत्रिकरण होईल. या घडामोडीमुळे 'मॅग्मा फिनकॉर्प'चा वित्तीय क्षेत्रात दबदबा वाढणार असून, कंपनीच्या पतमानांकनावर सकारात्मक परिणाम होईल, अशी शक्यता आहे. 

कंपनीचे भागधारक आणि नियामकांच्या मान्यतेनंतर या व्यवहाराची पूर्तता होईल. 'मॅग्मा फिनकॉर्प'च्या या प्रेफरन्शियल ॲलॉटमेंटच्या माध्यमातून ३ हजार ४५६ कोटी रुपयांची नव्याने भांडवली गुंतवणूक होणार आहे. या व्यवहारानंतर 'मॅग्मा फिनकॉर्प'ची नेटवर्थ ६ हजार ३०० कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असे सांगितले जाते. 

'रायझिंग सन होल्डिंग्ज'ने संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून अदर पूनावाला यांचे, तर 'पूनावाला फायनान्स'चे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) अभय भुतडा यांना व्यवस्थापकीय संचालक म्हणून नामांकीत केले जाईल. संजय चामरिया हे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. या व्यवहारानंतर 'मॅग्मा फिनकॉर्प' ही कंपनी कर्जवितरण क्षेत्रातील व्यापक संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज असणार आहे. 

 

मॅग्मा फिनकॉर्पमधील 'कंट्रोलिंग स्टेक' घेण्याएवढी भांडवली गुंतवणूक करताना मला विशेष आनंद होत आहे. देशाची अर्थव्यवस्था 'डबल डिजिट'मध्ये प्रगती करण्याच्या टप्प्यात असताना वित्तीय क्षेत्रातील व्यवसायाला अमर्यादित वाव आहे. वैधानिक आणि नियामकांच्या मान्यतेनंतरच या व्यवहाराची पूर्तता होणार आहे. 
- अदर पूनावाला, संचालक, रायझिंग सन होल्डिंग्ज

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख