
मुंबई : राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात 25 मे अखेर 36.68 टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 36.27 टक्के एवढे आहे. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात 401 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी शासन जलसाठयाचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्यांचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात 1924 दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या 47.22 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
त्यापाठोपाठ मराठवाडा विभागात 3 हजार 327 दलघमी म्हणजे 45.13 टक्के, कोकण विभागात 1567 दलघमी म्हणजे 44.65 टक्के, नागपूर विभागात 1620 दलघमी म्हणजे 35.18 टक्के, नाशिक विभागात 2138 दलघमी म्हणजे 35.62 टक्के तर पुणे विभागात 4381 दलघमी म्हणजे 28.8 टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.
तसेच टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाय योजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात 155 गावांना आणि 499 वाड्यांना 101 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात 117 गावे, 199 वाड्यांना 102 टँकर्स, पुणे विभागात 71 गावे आणि 360 वाड्यांना 70 टँकर्स, औरंगाबाद विभागात 43 गावे, 23 वाड्यांना 59 टँकर्स, अमरावती विभागात 69 गावांना 69 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकर्सची आवश्यकता भासलेली नाही. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरग्रस्त गावांमध्ये 53ने आणि वाड्यांमध्ये 116 ने वाढ झालेली आहे. तसेच टँकर्समध्ये 46 ने वाढ झालेली आहे. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण 401 टँकर्समध्ये 89 शासकीय आणि 312 खाजगी टँकर्सचा समावेश आहे.
हरभराची खरेदी मुदत वाढविणार....अजित पवार
या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून 32.83 लाख मेट्रिक टन अपेक्षित उत्पादन असताना 8.20 लाख मेट्रिक टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी 28 जून 2022 पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम दिनांक 29 मे 2022 असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाला सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.