सकारात्मक प्रेरणा देणारी व्यक्‍तीच नेतृत्व करू शकते : मुख्यमंत्री - Mumbai YIN Program CM | Politics Marathi News - Sarkarnama

सकारात्मक प्रेरणा देणारी व्यक्‍तीच नेतृत्व करू शकते : मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 डिसेंबर 2017

नेतृत्व विकास करताना कायम समाजबांधणी करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक प्रेरणा देणारी व्यक्‍तीच नेतृत्व करू शकते, अशी गुरुकिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ५) ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) नेतृत्व विकास परिषदेत तरुणांशी संवाद साधताना दिली. तुमच्या सकारात्मक कृतीतून एका तरी व्यक्‍तीच्या आयुष्यात परिवर्तन करता आले तर तुम्ही खरे देशभक्‍त ठराल आणि तेच खरे नेतृत्व, असे सांगत फडणवीस यांनी तरुणांच्या कानात सामाजिक बांधीलकीच्या नेतृत्वाचे वारे फुंकले.

मुंबई - नेतृत्व विकास करताना कायम समाजबांधणी करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक प्रेरणा देणारी व्यक्‍तीच नेतृत्व करू शकते, अशी गुरुकिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ५) ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) नेतृत्व विकास परिषदेत तरुणांशी संवाद साधताना दिली. तुमच्या सकारात्मक कृतीतून एका तरी व्यक्‍तीच्या आयुष्यात परिवर्तन करता आले तर तुम्ही खरे देशभक्‍त ठराल आणि तेच खरे नेतृत्व, असे सांगत फडणवीस यांनी तरुणांच्या कानात सामाजिक बांधीलकीच्या नेतृत्वाचे वारे फुंकले. स्वत:तील सुरक्षिततेवर मात करून आपल्याला कुठल्या दिशेने जायचे आहे हे ठरवून पुढे गेले तरच खरेखुरे नेतृत्व तयार होते, असेही ते म्हणाले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारपासून ‘यिन’ची तीन दिवसांची नेतृत्व विकास परिषद सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे उद्‌घाटन केले. त्या वेळी ते बोलत होते. समाजाला आज राजकारणाशिवाय सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे सांगून फडणवीस यांनी त्याची कमतरता भासत असल्याबाबत चिंता व्यक्‍त केली. त्या पार्श्‍वभूमीवर ‘यिन’सारखे व्यासपीठ नेतृत्व घडवण्याची महत्त्वाची सामाजिक बांधिलकी पार पाडत असल्याचे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. राज्यातील चार हजार महाविद्यालयांतून निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले ९०० युवा प्रतिनिधी तीन दिवसांच्या परिषदेला उपस्थित राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे विचार ऐकण्यासाठी सभागृह खच्चून भरले होते. तरुणांच्या प्रचंड उत्साहाने सभागृह गजबजून गेले होते.

व्यासपीठावर ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘एपी ग्लोबाले’चे चेअरमन अभिजीत पवार उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

कृतीतून व्यक्‍त होण्यासाठी तरुणांना ‘यिन’चे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे अभिजीत पवार यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील गुणात्मकता, नीतिमूल्ये आणि मेहनत हे गुण सर्वांनाच प्रभावित करतात, असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.

फडणवीस यांनी नेतृत्व कसे घडवावे, याचा मंत्र तरुणांना देत त्यांच्या विविध प्रश्‍नांनाही मोकळेपणाने उत्तरे दिली. माध्यम समूह कायम वाचकांना बांधून ठेवण्याच्या हेतूने विविध व्यासपीठे तयार करत असतात; मात्र सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या ‘सकाळ’ समूहाने मात्र महिला, युवक आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत सकारात्मक पाऊल उचलले असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तंत्रज्ञान समाजातील सर्व प्रकारचे भेदाभेद कमी करत प्रयत्नांच्या नवनवीन कसोट्यांवर पुढे पुढे जात असते. याच तंत्रज्ञानाचा फायदा देशाला आणि समाजाला पुढे नेण्यासाठी करा, असे आवाहनही त्यांनी तरुणांना केले. उद्‌घाटन समारंभात डॉ. भरत जेठवाणी यांच्या समूहाने गणेश वंदना सादर केली.

नेतृत्व विकासात समाजबांधणी महत्त्वाची
नेतृत्व विकास करताना कायम समाजबांधणी करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक प्रेरणा देणारी व्यक्‍तीच नेतृत्व करू शकते, असे सांगत प्रभू रामचंद्रांपासून शिवाजी महाराजांनी केलेल्या नेतृत्वाविषयीचे दाखले देवेंद्र फडणवीस यांनी दिले. समाजातील सर्वांत वंचित आणि डावलल्या गेलेल्या वर्गाला सोबत घेऊन रामाने दैत्यांना आणि शिवाजी महाराजांनी मोगलांना कसे चितपट केले त्याची उदाहरणेही त्यांनी तरुणांना दिली.
 

पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री, माशेलकरांसोबत काम करण्याची संधी
ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली ‘सकाळ’च्या ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ची माहिती मंगळवारी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिली. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) नेतृत्व विकास परिषदेच्या निमित्ताने ही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना मुख्यमंत्री आणि डॉ. माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणार आहे.

भाषणांपेक्षा कृती करा!
केवळ शब्दातून नव्हे, तर कृती करून नेतृत्व घडविण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित तरुणांना दिला. मोठमोठी भाषणे देण्यापेक्षा कृती करा. तुमच्या कृतीतून एका तरी व्यक्‍तीच्या आयुष्यात परिवर्तन करा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.

तुम्ही काय करणार ते महत्त्वाचे
कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना होत आहेत. महाराष्ट्रात असे प्रकार वाढले आहेत, असा मुद्दा कोल्हापूरच्या प्रेरणा शहा हिने मुख्यमंत्र्यांना विचारला होता. तो धागा पकडून अभिजित पवार म्हणाले, की सरकार काय करणार यापेक्षा तुम्ही काय करणार त्याला महत्त्व द्या. तुम्ही असा एक परिसर तयार करा जिथे बलात्कार, स्त्री अत्याचारासारख्या घटना घडणारच नाहीत. त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

‘यिन’चा पंतप्रधान व्हायला आवडेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील, अशा शब्दांत अभिजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुम्हाला यिन देशव्यापी करावे लागेल. मी स्वत:ला अजून युवक समजत असल्याने यिनचा पंतप्रधान व्हायला नक्कीच आवडेल.’

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख