आदित्य ठाकरे यांची `सावली` मोठी होऊ लागली...

वरुण सरदेसाई यांना सरकारी सुरक्षा देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या...
VARUN SARDESAI-ADITYA
VARUN SARDESAI-ADITYA

ठाकरे सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची व्यवस्था काढून घेतल्यानंतर किंवा कमी केल्यानंतर त्यावर राजकीय टिकाटिप्पणी सुरू झाली. बड्या राजकीय नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करताना काही नवीन नावेही सुरक्षा व्यवस्था पुरविण्याच्या यादीत समाविष्ठ झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नव्याने प्रोटोकाॅलनुसार यात आले. पण अनेकांच्या भुवया उंचावल्या त्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नावावर. शासकीय पद नसताना केवळ आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सरदेसाई हे एक्स दर्जाच्या सुरक्षाव्यवस्थेचे मानकरी झाले. म्हणजे त्यांच्यासोबत चोवीस तास एक किंवा दोन पोलिस कर्मचारी सोबत असतील. 

ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर जे काही नवे चेहरे सत्तेच्या वर्तुळात दिसत आहे त्यात सरदेसाई अग्रस्थानी आहेत. आदि्त्य ठाकरे यांचे मावसभाऊ म्हणून त्यांनी युवा सेनेत शिरकाव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि आदित्य हे मंत्री झाले आणि सरदेसाई यांच्या चेहऱ्याला मग वलयदेखील प्राप्त झाले. हे वलय इतके वाढले की त्यांच्या नावाचा उल्लेख विधानसभेत आणि महाआघाडी सरकारच्या नेत्यांच्या मुखातही झाला. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी `वरुण`राजाची कृपा झाल्याशिवाय फाईल मंजूर होत नसल्याचा आरोप केला होता. नव्या सरकारमध्ये सरदेसाई हे आदित्य ठाकरेंसोबत शासकीय बैठकांना उपस्थित राहू लागल्याने महाआघाडी सरकारमधील मंत्री नबाब मलिक यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच असे प्रकार घडू नये, असाही इशारा दिला होता. त्यानंतर सरदेसाई थेट बैठकांत येणे बंद झाले. पण आदित्य यांची सावली बनलेले सरदेसाई यांचा मंत्रालयातील वावर कमी झालेला नाही. 

सरदेसाई हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी पुन्हा केला. या हस्तक्षेपाला हे अधिकारी वैतागले असल्यामुळेच सरदेसाई यांना सुरक्षा सरकारला पुरवावी लागली, अशी तिरकस टीकाही राणेंनी केली. आदित्य यांना भेटण्यासाठी सरदेसाई यांचा अडथळा पार करावा लागतो, अशीही कुजबूज सुरू असते. 

मुंबई विद्यापीठातील निवडणुकीत काही वर्षांपूर्वी युवा सेनेने दणदणीत विजय मिळाल्यानंतर सरदेसाई हे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. यामागे त्यांची व्यूहरचना होती, असे म्हणतात. त्यानंतर झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला होता. या निवडणुकीत सेनेने भाजपवर मात केली. त्या निवडणुकीतही सरदेसाई यांच्यावर जबाबदारी होती. ती योग्य पार पाडल्याने उद्धव यांचाही त्यांच्यावर विश्वास बसला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सरदेसाई यांनी `मास्टर स्ट्रोक` मारला. ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदा थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली.  `हिच ती वेळ, महाराष्ट्र तुमची वाट पाहत आहे,` असे आवाहन पहिल्यांदा युवा सेनेने करत आदित्य यांच्या निवडणूक रणनीतीची सुरवात केली. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य सहज विजयी झाले. त्या वेळीही वरुण सरदेसाई नावाची सेनेच्या वर्तुळाबाहेरही चर्चा झाली. याच विधानसभा निवडणुकीत सरदेसाई यांच्या नावाची चर्चा कल्याण (ग्रामीण) या मतदारसंघाचे सेनेचे उमेदवार म्हणूनही होती. 

आदित्य यांचे सर्व विषयांचे सल्लागार आणि मित्र अशा भूमिकेत सरदेसाई आहेत. मुंबई महापालिका असो की मंत्रालय आदित्य यांचे काम करणारा माणूस अशी ओळख त्यांना मिळाली आहे. शिक्षणाने MS असलेले सरदेसाई हे आपल्या ट्विटद्वारे राजकीय भूमिकाही मांडत असतात. ही भूमिका आदित्य यांची असते, असे समजण्याइतपत विश्वास त्यांनी कमावला आहे.  पोलिस सुरक्षा व्यवस्था मिळाल्याने सरदेसाई यांचे वजन अजून कायम असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी राजकीय फासे त्यांच्या सोयीचे पडत आहेत. त्यामुळेच आदित्य यांची `सावली` मोठी होत आहे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com