मुलुंडकरांचे पप्पाजी सरदार : अक्कडबाड मिशांचा दिलदार आमदार

40 वर्षे नगरसेवक आणि 20 वर्षे आमदार राहिलेला मुलुंडचा अनभिषिक्त सम्राट
sardara tarasingh.jpeg
sardara tarasingh.jpeg

आकाशाकडे वळवलेल्या अक्कडबाज मिशा, शीख पद्धतीच्या भरघोस दाढीमिशा व पगडी, कपाळावर ठसठशीत लाल टिळा अशा रुपातले सरदार तारासिंह प्रथमदर्शनी उग्र-राकट वाटत. पण प्रत्यक्षात ते बरोबर त्याविरुद्ध म्हणजे अत्यंत मनमिळाऊ, उत्साही, लाघवी स्वभावाचे, कोणालाही भुरळ पाडणारे, लहानथोरांना मान देणारे व त्यांची कामे करणारे होते. कधीही कोणावरही न चिडणे, `पंजाब दा पुत्तर` स्टाईलचे अघळपघळ बोलणे, तसेच बोलताना प्रथम एकदोनदा डोळे मिचकावण्याची त्यांची लकब नकळत समोरच्याला आपले करून जायची. त्याचमुळे आणि आपल्या प्रचंड कामांमुळे त्यांनी गेली साठ वर्षे मुलुंडवर आपले सम्राज्य उभारले व लोकहितासाठी तळमळीने त्यांचा वापर केला. 

आपल्या अफाट कामाच्या जोरावर तारासिंह यांनी तेवढाच प्रचंड लोकसंग्रह निर्माण केला होता. या सर्वांची कामे त्यांनी केली होती, त्यांच्याकडे काम घेऊन आलेला कोणीही नागरिक निराश होऊन जात नसे, अशी त्यांची ख्याती होती. महापालिका-पोलिस ठाणे येथे त्यांचे प्रचंड वजन होते, शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच त्यांनी आपल्या कामांनी बांधून ठेवले होते. त्याचमुळे आठ वेळा नगरसेवक व चार वेळा आमदारपदाचा मान जनतेने त्यांनी आनंदाने दिला. ते केव्हाही मंत्री नव्हते तरीही मुलुंडमध्ये त्यांना मंत्र्याएवढाच मान होता.

लोकांची कामे करणारा अजातशत्रू आमदार व सर्वपक्षीयांशी घनिष्ठ संबंध असलेला नेता अशी त्यांची  ओळख होती. गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्व राजकारण्यांबरोबर त्यांची उठबस होती, पत्रकारांशीही त्यांची मैत्री होती, अगदी `मातोश्री`मध्येही त्यांचे येणेजाणे होते. याचा उपयोग त्यांनी अर्थातच लोकहितासाठीच केला. 

पप्पाजी या लाडक्या नावाने ते ओळखले जात असत. स्वतः शीख असूनही भाजपसारख्या हिंदुवादी पक्षात त्यांचे आयुष्य गेले. अर्थात तरीही सर्वभाषिकांशी आणि सर्वधर्मीयांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. मुस्लिम-ख्रिस्ती आदी नागरिकही त्यांच्याकडे कामांसाठी येत असत व ती कामे होतही असत. भांडूप-मुलुंडमध्ये त्यांची कित्येक जनसंपर्क कार्यालये होती व अधिवेशनाचा काळ सोडता ते तेथे नियमितपणे येत असत. ते आल्यावर तेथे लोकांचा गराडाच पडत असे. तेथे आलेल्यांना, बोलो बेटा क्या काम है, अशी साद घालून चहा-पाणी देत ते त्याला प्रथम आपलेसे करून घ्यायचे व त्याचे कामही करायचे. 

डोंगराळ भागातील गरीबांच्या घरी जाऊनही त्यांनी त्यांची कामे केली होती, वाटेत कोणीही लहान मुलगा दिसला की ते त्याला हमखास चॉकलेट देत असत. मोटारीने आपल्या खास परिचयातील व्यक्तींच्या घराखालून जाताना मोठमोठ्याने हॉर्न वाजवून जणुकाही मैत्रीची हाकच ते देत असत. गणेशविसर्जन तलावांची निर्मिती, तरुणांसाठी जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्याने, शाळांमध्ये जाऊन वस्तूवाटप, मुलांना प्रवेशासाठी मदत व मार्गदर्शन, गरीबांना धान्य आणि आर्थिक मदत, असंख्य उद्याने व ओपन जीम ची उभारणी अशी कमाई त्यांनी साठ वर्षांत केली. त्यांनी मुलुंडमध्ये प्रार्थना-ध्यानधारणेसाठी पिरामिड गार्डन उभारले होते. तेथे प्रार्थना केल्यावर अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी ठाम धारणा तेथे येणाऱ्या अनेकांची होती. कामे ही त्यांची ओळख त्यांना एवढी घट्ट चिकटली होती की `मेरा कामही मेरी पेहेचान` है असे त्यांनी आपल्या मोटारीवर लिहिले होते व ते अत्यंत सार्थ होते. 

कशालाही न घाबरता कोणत्याही गोष्टीला भिडण्याच्या त्यांच्या स्वभावाचा एक किस्सा सांगितला जातो. दहा वर्षांपूर्वी एकदा मुलुंडमध्ये असाच काही कारणांमुळे समरप्रसंग उद्भवेल अशी परिस्थिती निर्माण झाली. दोन गट समोरासमोर आले होते, पण प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वीच सरदार तारासिंह तेथे आले व आपल्या पद्धतीने त्यांनी दोनही बाजूंना शांत केले व प्रकरण निवळले. 

विधानसभेतील त्यांची कामगिरीही अशीच उत्कृष्ट होती. मुलुंडचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या तारासिंह यांचे वाढते वय आणि ढासळती प्रकृती यामुळे त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकिट नाकारण्यात आले. मात्र त्याचे त्यांना जराही वाईट वाले नाही व त्यांनी आपले कामाचे व्रतही सोडले नाही. त्यांच्याबद्दल अनेक अफवा उठल्या तरी, मी भाजप सोडून कोठेही जाणार नाही, मेरा कामही मेरी पेहचान है, मला पद नसले तरी काहीही फरक पडत नाही, असेच ते सांगत राहिले. पंजाब महाराष्ट्र बँक प्रकरणामुळेही ते व्यथित झाले होते. आयुष्यात कधीही हार न मानलेल्या या मुलुंडच्या सिंहाला शेवटी आजारांवर मात करणे जमलेच नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com