मनसेचा आक्रमक आवाज असलेल्या संदीप देशपांडेंबद्दल हे तुम्हाला माहिती आहे? - do you know about MNS leader Sandeep Deshpande | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेचा आक्रमक आवाज असलेल्या संदीप देशपांडेंबद्दल हे तुम्हाला माहिती आहे?

कृष्णा जोशी
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

राज ठाकरेंचे बाजीप्रभू देशपांडे

मुंबई : ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांनी मराठीच्या सन्मानासाठी सोन्याच्या दुकानाबाहेर एकट्यानेच सत्याग्रह सुरु केल्याचे कळल्यावर मराठीसाठी लढणारे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे आज तेथे जाऊन आपल्या पद्धतीने त्या दुकानदाराला वठणीवर  आणले. देशपांडे यांची ही पहिलीच कामगिरी नसून त्यांनी यापूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांची पत्रकार परिषदही उधळून लावली होती. एकदा त्यांनी महापालिकेच्या अभियंत्यालाही त्याच्याच दालनात आपल्याबरोबर कोंडून ठेवले होते. देशपांडे हे सध्या मुंबईतील मनसेचे सर्वात आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.
 

मनसेतर्फे सन 2012 मध्ये नगरसेवकपद भूषविलेल्या संदीप देशपांडे यांनी आजवर मराठीची प्रतिष्ठा जपण्यासाठी कित्येक लहानमोठी आंदोलने केली असून त्यात त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला आहे. एकदा तर त्यांनी चार सहकाऱ्यांसह गुजराती व्यापाऱ्यांचा वेश धारण करून गुजराती व्यापाऱ्यांच्या बैठकीत जाऊन ती बैठक उधळली होती. देशपांडे यांच्यावर अजूनही विविध आंदोलनप्रकरणी सोळा ते सतरा गुन्हे दाखल आहेत.

भारतीय विद्यार्थी सेनेतून सुरवात

संदीप देशपांडे यांनी आपल्या चळवळ्या जीवनाची सुरुवात महाविद्यालयापासूनच केली होती. 1991 मध्ये रुपारेल महाविद्यालयात शिकताना त्यांनी महाविद्यालयीन निवडणुका तसेच शिवसेना शाखेत जाऊन निवडणुकीची कामे केली होती. मात्र त्यावेळीही शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना जरा लांबच ठेवत अशी त्यांची खंतही होती. तेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे अध्यक्ष असल्याने त्यांचा संपर्क होताच. पण  1996-97 नंतर राज ठाकरे बॅकसीटवर गेले व देशपांडे यांनीही आपल्या व्यवसायात लक्ष घातले.

 

सदा सरवणकर यांना तोडीस तोड उत्तर

2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यावर त्यांना मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्षपद मिळाले. त्याच दरम्यान शिवसेनाभवनच्या खाली झालेल्या राड्यादरम्यान सेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्याशी तोडीस तोड बाचाबाची करून देशपांडे यांनी आपल्या आक्रमक स्वभावाची चुणुक दाखवून दिली. या बाचाबाची नंतर तेथे दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफानी हाणामारी झाली होती व त्यातही देशपांडे यांचा सक्रीय सहभाग होता.

मराठी पाट्यांसाठी आंदोलन

2008 मध्ये राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या मोठ्या आंदोलनातही देशपांडे यांनी भाग घेऊन गुन्हेही अंगावर घेतले. त्याचवर्षी दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात यासाठी मनसेने केल्या आंदोलनात त्यांना चार दिवस पोलिस ठाण्याच्या कोठडीतही काढावे लागले होते. मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या चार सहकाऱ्यांसह गुजराती व्यापाऱ्यांचा वेश धारण करून पोलिसांना चकवा देऊन गुजराती व्यापाऱ्यांच्या बैठकीत शिरून ती बैठकही उधळून लावली होती.

 

गुजराती व्यापाऱ्यांना असे गंडविले

दक्षिण मुंबईत ही बैठक एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुरु होती व आंदोलनामुळे खाली तीनशे पोलिसांचा बंदोबस्त  होता. देशपांडे व त्यांच्या तिघा सहकाऱ्यांनी गुजराती-मारवाडी पद्धतीचा झब्बा-कुडता घातला, कपाळावर टिळा लावला, एखाद्याने टोपी परिधान केली, हातात गुजराती मिड डे व गुजरात समाचार अशी वर्तमानपत्रे घेतली. त्यामुळे हे देखील बैठकीला आलेले व्यापारी असतील असे वाटून पोलिसांनी अडवले नाही. पोलिस कार्ड मागतील हे ठाऊक असल्याने त्यांनी आधीच भलत्याच व्यापाऱ्यांची व्हिजिटिंग कार्डेही आणली होती. बैठकीत शिरून घोषणाबाजी सुरु केली व खाली उरलेल्या कार्यकर्त्यांनी एक दुकान फोडले आणि ती बैठक गुंडाळण्यात आली.

अमरसिंहांची पत्रकार परिषद उधळली

उत्तर भारतीयांविरुद्धचे आंदोलन पेटलेले असताना राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची कुणकुण देशपांडे यांना लागली. आपल्या काही सहकाऱ्यांसह ते आधीच गुपचूप पत्रकार परिषदेत जाऊन बसले. अमरसिंह यांनी वक्तव्यादरम्यान राज ठाकरेंवर टीका केल्यावर देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा करून त्यांना बोलणे थांबवणे भाग पडले.
 

पोलिस कोठडी सोडली नाही...

तुळशीपाईप रोड वरील पुलावर खड्डे पडल्याने देशपांडे यांनी महापालिकेचे मुख्य अभियंत्यांना (रस्ते) त्यांच्याच दालनात आपल्यासोबत तीन चार तास कोंडून ठेवले होते. अखेर आयुक्तांनी कामाचे आश्वासन दिल्यावरच अभियंत्यांची सुटका झाली. मात्र याप्रकरणी देशपांडे यांना तीन दिवस पोलिस कोठडीत रहावे लागले  होते. त्यांना जामीन लगेच मिळाला असता, पण या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खड्डे नीट होत नाहीत तोपर्यंत जामीन घ्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले होते. अखेर जामिनावर  बाहेर येण्याचा आदेश राज ठाकरे यांनीच दिल्यावर ते बाहेर आले. सन 2010 मध्ये तर त्यांनी या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सुरु असताना तेथे शिरकाव करून वादावादी केली होती.

शोभा देशपांडेंसाठी पुढाकार घेतला..

आजदेखील शोभा देशपांडे या ज्येष्ठ लेखिका मराठीच्या सन्मानासाठी रात्रभर आंदोलन करीत आहेत हे त्यांना सकाळी सकाळी शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करताना कळले. तत्काळ त्यांनी कार्यकर्त्यांसह दक्षिण मुंबईतील त्या दुकानावर धाड घातली. पोलिसांनी बोलावूनही तो दुकानदार येत नसल्याने देशपांडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून त्याला बोलावून घेतले. त्या दुकानदाराला मराठी येते हे कळल्यावर तर देशपांडे यांचा पारा आणखीनच चढला. कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराला थोडासा प्रसाद दिला. पण तुला मराठी येते मग कालच बोलला असतास तर प्रकरण वाढलेच नसते अशी समज देऊन देशपांडे यांनी शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता केली. मुख्य म्हणजे मराठीच्या सन्मानासाठी आता शिवसेनेच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे बाजीप्रभू देशपांडे तत्काळ धावून जात असल्याने त्याचा फायदा यापुढेही त्यांना तसेच त्यांच्या पक्षाला मिळण्याची अपेक्षा आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख