milind narvekar
milind narvekar

मिलिंद नार्वेकरांसाठी आजचा दिवस आणखी महत्त्वाचा!

उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून सर्वत्र संचार असलेले नार्वेकर महाआघाडी सरकारमध्ये आपला दराराराखून आहेत.

मुंबई : `चायपेक्षा किटली गरम`, हे ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरींनी नेत्यांच्या स्वीय सचिवांबद्दल उच्चारलेले वाक्य मिलिंद नार्वेकर यांना लागू होते असे म्हणतात. उद्धवजींपर्यंत पोहोचायचे असेल तर नार्वेकरांना ओलांडूनच पुढे जाता येते, असेही बोलले जाते.

अत्यंत विचित्र परिस्थितीत उद्धव ठाकरे ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच समवेत मुख्यमंत्री झाले. वळण अनपेक्षित होते.या कालावधीत संजय राऊत जाहीरपणे लढाई लढत होते. अन मिलिंद नार्वेकर नेत्यासमवेत होते. मावळत्या सरकारमध्ये फडणवीसांशी समन्वय साधण्याची जबाबदारी याच नार्वेकरांनी सांभाळली होती.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून सहा महिन्यांपूर्वी शपथविधी झाला. मात्र त्यांच्या आमदारकीच्या प्रक्रियेत कोरोनाचे विघ्न आले. आरोप- प्रत्यारोप होत असताना आमदारकी मार्गी लागावी यासाठी प्रयत्न करत होते ते नार्वेकर. उद्धव ठाकरेंचे हनुमान. राज्यपाल कोशियारी यांच्याशी संवाद साधून दिल्लीतील भाजप नेत्यांशी रदबदलीच्या ज्या हालचाली सुरू होत्या. त्या ठाकरे कुटुंबाखेरीज माहित होत्या त्या नार्वेकरांनाच.

कॉंग्रेसने सहाव्या उमेदवाराचा आग्रह धरला तेंव्हा तो सोडा असा सांगावा दिला तो नार्वेकरांनीच. हट्ट सुटेना तेव्हा आधीच स्पष्ट केले होते की उद्धवजीं मग उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. हा निरोप दिला तो याच नार्वेकरांनी. आज त्यांच्या वाढदिवसालाच उध्दवजींनी आमदारकीची शपथ घेतली हा योगायोग. पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा या भाजपनेत्यांसमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत सर्वदूर संचार नार्वेकरांचाच. आदित्य ठाकरे यांची चमू वेगळी पण त्यांच्यासमवेत सोनिया गांधींना भेटायला गेले मिलिंद नार्वेकरच. `चलो अयोध्या`चा नारा देताच मातोश्रीसमोर फलक लावला तो या हनुमानानेच. आज लॉकडाउनबद्दल उद्धवजींचे सर्वात महत्वाचे भाषण झाले. त्या आधी बीकेसीतले रुग्णालय बघून, रश्मीवहिनींच्या आईंना वाढदिवसाचा नमस्कार करून नार्वेकर त्यांच्यासमवेत हजर होते. मिलिंद नार्वेकर काय करतात? त्यांचा उदय कसा झाला? बाळासाहेब आणि आदित्य या दोघांचीही फार मर्जी नसताना ते उद्धवजींच्या एवढे जवळचे कसे हा प्रश्न आहेच. गूढ असलेला हा इसम काहीही झाले तरी उद्धव ठाकरेंचा हनुमान आहे. आज कोरोना संकट नसते तर नार्वेकरांच्या उत्तम वस्तीतल्या घरासमोर केवळ शिवसैनिकांनीच नव्हे तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रांगा लावल्या असत्या. त्यांच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घ्यावी ही बाब नार्वेकरांसाठी आणखी अभिमानाची. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com