वाद उफाळला : आमदाराला मोठं पद मिळताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील वाद उफाळून आला आहे.
Youth Cong working president quits after Zeeshan Siddiquis appointment
Youth Cong working president quits after Zeeshan Siddiquis appointment

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील वाद उफाळून आला आहे. पक्षाकडून आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कार्यकारी अध्यक्ष सुरज सिंह ठाकूर यांनी सिद्दीकी यांच्या निवडीवर आक्षेप घेत बुधवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. (Youth Cong working president quits after Zeeshan Siddiquis appointment)

सिद्दीकी हे बांद्रा पुर्वचे आमदार असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहे. सिद्दीकी यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे. बुधवारी सकाळी झिशान यांनी ट्विट करत आपल्या निवडीब्दल सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे आभार मानले. तसेच मला मत दिलेले युवक काँग्रेसचे 88 हजार 517 सदस्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. 

सिद्दीकी व ठाकूर यांच्या निवडीची घोषणा 15 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यानंतर दहा दिवसांतच ठाकूर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले, या निर्णयामुळं निराश झालो आहे. कोणताही राजकीय अनुभव नसलेल्या व्यक्तीसोबत काम करू शकत नाही, असं म्हणत ठाकूर यांनी आपला राजीनामा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवला आहे. 

काँग्रेसमध्ये प्रसिध्दीपेक्षा तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आणि संघटनेत काम केलेली व्यक्ती व अनुभवाला प्राधान्य मिळते, असा माझा नेहमीच विश्वास होता. पण या निर्णयानं माझी निराशा केली. त्यामुळे काँग्रेसच्या महत्वाच्या संघटनेची जबाबदारी दिलेल्या आणि अनुभव नसलेल्या व्यक्तीसोबत काम करू शकणार नाही, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे. 

ठाकूर यांच्या राजीनाम्यावर बोलताना सिद्दीकी म्हणाले, त्यांचा राजीनामा दुर्दैवी आहे. त्यांना पुन्हा परत येण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल. मी दहा वर्षांपासून युवक काँग्रेसमध्ये काम करत आहे. या काळात तीन महत्वाची पदंही भुषवली आहेत. डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये मला सर्वाधिक मतं मिळाली आहेत, असं सिद्दीकी यांनी सांगितलं. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला मजबूत स्थितीत आणण्याचे ध्येय असल्याचंही सिद्दीकी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com