फिल्मसिटी उभारा...पण मुंबई `स्पिरीट`ही घेऊन जा!

योगीजी, तुम्ही उत्तर प्रदेशात अवश्‍य फिल्मसिटी उभारा पण त्यासाठी तुम्हाला काही मराठी अभिनेत्यांना भेटावे लागेल. बाॅलिवूडची कथा तुम्हाला ऐकावी लागेल. फिल्मसिटी उभारताना महाराष्ट्राने काय प्रयोग केले, हे तुम्हाला कळाले असते. सगळ्यात महत्त्वाचे सोबत `मुंबई स्पिरीट`ही घेऊन जावे लागेल.
yogi adityanath ff
yogi adityanath ff

योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारायची आहे. योगींसारख्या संन्याशी नेत्याला चित्रपटांचे आणि चित्रपटनगरीचे आकर्षण वाटावे हेच विशेष आहे. भगव्या कपड्यातील मंडळींना कला, चित्रपट यांचा तिटकारा असतो, असा सर्वसाधारण समज आहे. तो योगींपुरता तरी दूर झाला आहे. योगींनी मुंबईत आल्यानंतर बॉलीवूडमधील अभिनेत्यांच्या, निर्मात्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे योगी हे बॉलीवूड उत्तर प्रदेशात नेणार, अशी चर्चा सुरू झाली.

बॉलीवूड नेणे एवढे सोपे आहे ? भारतीय चित्रपटाचा इतिहास जेथे रचला आणि तो समृद्ध सुरू झाला. ती ही मुंबई महानगरी आहे. दादासाहेब फाळकेंसारख्या प्रयोगशील मराठी माणसाने भारतातील पहिला चित्रपट तयार करून मुंबईसाठी आणि देशासाठी नवीन दालन सुरू करून दिले. प्रभातसारख्या मराठी माणसाच्या चित्रपट कंपनीने यात मोलाची भर घातली. प्रभातचे चित्रपट व्यावसायिक आणि कलात्मक आणि तांत्रिक दृष्टीने जगभर गाजले. हा भारतीय चित्रपटसृष्टीचाही वेगळ्या अर्थाने गौरव होता. मुंबईत मराठी माणसांची नाट्यचळवळ आधीपासून जोरात होती. त्यामुळे अतिशय गुणवान कलाकार या चित्रपटसृष्टीला मिळण्याचा मार्ग येथे सुकर झाला. 

मराठी माणसाने सर्वांचे स्वागत केले....

मुंबईसारखे शहर त्याच्या नैसिर्गिक रचनेमुळे व्यापारासाठी आदर्श ठरले. ब्रिटिशांना या शहराचा लळा लागला. मूळ मुंबईकर असलेल्या मराठी माणसाने आपल्या हे शहर सर्वांना आपलेसे वाटेल, असा अतिथी भाव ठेवला. गायन, वादन, नृत्य, चित्रपट अशा कोणत्याही कलांत नाव कमवायचे असेल मुंबईशिवाय देशातील कोणत्याही कलाकाराला पर्याय नव्हता. येथे दाद देणारे रसिकही दर्जाचे होते. उत्तम गायक, वादक, अभिनेते या ही मुंबई सर्वांना आपलेसे करत गेली आणि अजूनही करतेच आहे. कलेच्या प्रांतात कोलकत्ता, लाहोर ही शहरे मुंबईच्या स्पर्धेत होती. पण ती कधीच मागे पडली आणि बॉलिवूड मुंबईचे आणि मुंबई बॉलिवूडची झाली. तो सिलसिला आजही कायम आहे. 

बाॅलीवूड का बहरले?

योगी आदित्यनाथांना हा इतिहास लक्षात घ्यावा लागणार आहे. तुम्ही मराठी कलाकाराला भेटला असता तर हा इतिहास त्याने तुम्हाला नक्की सांगितला असता आणि तुम्हालाही बॉलिवूड मुंबईतच का बहरास आले, याचे उत्तर मिळाले आहे. 
पेशावरच्या युनूसखानला या बॉलिवूडने दिलीपकुमार म्हणून स्वीकारले. चेन स्मोकर असलेल्या देवआनंद याने कधी व्ही. शांताराम या मुरब्बी दिग्दर्शकासमोर सिगरेट ओढण्याचे धाडस केले नाही. लता मंगेशकरांच्या आवाजाशिवाय आपल्या चित्रपटाला यश मिळत नाही, याचा पुरेपूर अनुभव राज कपूरने घेतला. मराठी अमोल पालेकर आणि बंगाली बासू चटर्जींची जोडी या मुंबईतच जमली. नाना पाटेकरच्या आवाजाला पर्याय नाही म्हणून प्रकाश झा सारख्या दिग्दर्शकाला तोच हवा असतो. आशुतोश गोवारीकरसारखा प्रतितयश, प्रतिभावान दिग्दर्शक काळाचा पट आपल्यासमोर उलगडतो. त्यानेही तुम्हाला अतिशय चांगल्या सूचना करून तुमच्या प्रकल्पाला हातभारच लावला असतो.

या बॉलीवूडला संरक्षणही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी दिले. खंडणीसाठी फोन करून बॉलीवूड कलाकारांना छळणाऱ्यांना प्रसंगी एन्काउंटरमध्ये टिपण्याचे धाडस मुंबईच्या पोलिसांनी दाखविले. "मुंबई स्पिरीट" म्हणजे परक्‍यालाही आपलेसे करणारी या मातीची परंपरा आहे. मुंबईत कोणी उपाशी मरू शकत नाही, असे म्हणण्याचा विश्वास यामुळेच मिळाला. 

योगीजी, तुम्ही हे सर्व जाणून घ्यायला हवे. तुम्ही उत्तर प्रदेशात अवश्‍य फिल्मसिटी उभारा. तुम्ही हे जाणून आहात की बॉलीवूड हा काही जमिनीचा चौरसफुटाचा तुकडा नाही. ती एक कार्यसंस्कृती आहे आणि ती मराठी माणसाच्या सहभागामुळे तयार झाली आहे. हे सारे तुम्हाला जाणून घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी तुम्हाला हितल्या मातीशी नाळ जुळलेल्यांचे चार अनुभवाचे बोल नक्की उपयोगी पडतील. त्यासाठी सहकार्य देण्यास महाराष्ट्राचा माणूस नक्की अग्रभागी राहील. फिल्मसिटी उभारताना महाराष्ट्राने काय प्रयोग केले, हे तुम्हाला कळाले असते. म्हणूनच मराठी माणसाला न भेटता तुम्ही फिल्मसिटीचा संकल्प सोडलाय. त्यामुळे तुमचा हा दौरा अर्धवट राहिलाय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com