धनंजय मुंडे निवडून आले पण परळीत पंकजा मुंडेंना कोणी पाडले : अजित पवारांचा सवाल - who defeats Pankaja Munde in Parali asks Ajit Pawar in assembly | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे निवडून आले पण परळीत पंकजा मुंडेंना कोणी पाडले : अजित पवारांचा सवाल

उमेश घोंगडे
बुधवार, 10 मार्च 2021

अर्थसंकल्पाला उत्तर देताना अजित पवारांची राजकीय टोलेबाजी... 

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार राजकीय बॅटिंग केली. भाजपच्या नेत्यांना चिमटे काढत राजकीय टिकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की प्रत्येक वेळी बोलण्याची संधी मिळाली की मुनगंटीवार म्हणतात हे राष्ट्रपती राजवट लागू करणार, सरकार पडणार अस म्हणतात. सत्ता गेल्याने अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांना वैफल्य आले आहे. भाजपमधील अनेकांना विधानसभेच्या वेळी तिकिट मिळाले नाही. काही जण नेमके पराभूत झाले. परळीत धनंजय मुंडे हे विजयी झाले पण तेथे भाजपच्या उमेदवाराला (पंकजा मुंडे) कोणी पाडले, याची चर्चा राज्यात आहे. अनेकांना तिकीट दिले नाही. बायकोला तिकीट देतो अस सांगितलं त्याला ही नाही आणि बायकोला ही नाही, अशा चंद्रशेखर बावनकळेंचाही किस्सा त्यांनी या निमित्ताने सांगितला. चंद्रकांतदादा पाटील शांत आहेत. ते वेळ आल्यावर बोलतात, असे कौतुकही अजित पवारांनी केले. कोणीच ताम्रपट जन्माला घेऊन आलेला नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. एकनाथ खडसे यांची तुम्ही काय अवस्था केली होती, असाही सवाल त्यांनी विचारला.  

ते म्हणाले की कोविड संकट असताना आम्ही शेती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य यावर भर दिला आहे. कृषी क्षेत्राने आपल्याला यावेळी वाचवले. त्यामुळे शून्य टक्के व्याजदर योजना जाहीर केली. फडणवीस सरकारने कर्जमाफी केली. त्यानंतर शेतकरी नियमित कर्जफेड करतील, असे अपेक्षित होते. मात्र यापुढे शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न असून 31 मार्चपर्यंत नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन आम्ही देणार आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी पाच लाख सोलार पंप देणार आहोता. यातील तांत्रिक चुका दुरुस्त करत ही योजना राबविण्यावर भर देणार आहोत. शेतकरी वीजबिलचा थकबाकी सुमारे 45 हजार कोटी होते. त्यातील 15 हजार कोटी व्याज आणि दंड हे माफ केले आहे. केंद्र सरकाकडून राज्याला 30 हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. मात्र, राज्याला एक लाख कोटींची गरज आहे.

पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लावावा, अस केंद्राचा विचार आहे. त्याला आमचा पाठिबा आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी होतील. राज्यालाही त्याचा फायदा होईल. ई निविदा मर्यादा तीन लाख रुपयांहून 10 लाखपर्यँत करण्याची घोषणा त्यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख