विधान परिषदेच्या आमदारकीच्या यादीत शिवसेनेकडून अनपेक्षित नावे... - Unexpected names from Shiv Sena in the list of MLAs of the Legislative Council | Politics Marathi News - Sarkarnama

विधान परिषदेच्या आमदारकीच्या यादीत शिवसेनेकडून अनपेक्षित नावे...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काही संभाव्य नावांची यादी तयार केल्याची माहिती आहे. यामध्ये सचिन आहिर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, युवासेनेचे वरूण देसाई, राहूल कनाल आणि कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा समावेश असल्याचे समजते.

मुंबई ः राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस पक्षांकडून काही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  शिवसेनेकडून राज्यपाल कोट्यातून कुणाला संधी द्यायची यावर पक्षात सध्या जोरदार खल सुरू आहे. शिवसेनेने या नावाबद्दल कमालीची गुप्तता पाळली असून ही अनेपेक्षित नावे असतील असा दावा शिवसेनेच्या एका आमदाराने केला आहे. त्यामुळे ही अनपेक्षित नावे कोणती? याची उत्सूकता ताणली गेली आहे.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड उद्या (ता.२९) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील तीन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे मंत्रीमंडळासमोर ठेवण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून सेनेते प्रवेश केलेले माजी मंत्री सचिन आहिर यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती. शिवाय आहिर यांना पक्षात प्रवेश देतांनाच आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे पक्ष त्यांच्या नावाला हिरवा कंदील देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे ज्यांनी आपला वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला, त्यांना देखील तुमचे पुनर्वसन केले जाईल, असा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे. युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी विधान परिषद सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेली वयाची अट नुकतीच पुर्ण केली आहे. त्यामुळे तरूण चेहऱ्याला संधी म्हणून त्यांच्या नावावर देखील पक्षात खल सुरू असल्याचे बोलले जाते.

मातोश्रीशी जवळीक साधून असलेले युवासेनेचे आणखी एक पदाधिकारी राहूल कनाल यांनी देखील राज्यपाल कोट्यातून संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर, मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे पदाधिकारी आदेश बांदेकर यांच्या नावावर पक्षात चर्चा सुरू असून शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सावली म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची देखील पक्षात चर्चा आहे.

शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही माजी खासदारांपैकी कुणाला संधी द्यायची का? यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. या शिवाय मराठवाड्यातील विधासभा निवडणुकीत पराभूत झालेले अर्जून खोतकर, बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचीही नावे चर्चेत होती. पण ती आता मागे पडल्याचे दिसते. तर मराठवाड्यातील दुसऱ्या पक्षातील एका मोठ्या महिला नेत्याला शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याची देखील चर्चा गेल्या काही दिवसापासून होती, पण हे नाव देखील बाद झाल्याचा दावा या आमदाराने केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख