`ज्या अण्णासाहेबांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलं.. त्यांच्याच चिरंजिवांना पदच्युत केलं!` - Sambhajiraje criticizes govt for dismissing Annasaheb Patil corporation | Politics Marathi News - Sarkarnama

`ज्या अण्णासाहेबांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलं.. त्यांच्याच चिरंजिवांना पदच्युत केलं!`

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

नरेंद्र पाटलांना राज्य सरकारवरील विशेषतः अशोक चव्हाणांवरील टीका भोवल्याचे मानले जात आहे..  

पुणे : ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे, अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकावर टीका केली आहे. 

खासदार संभाजीराजे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पदच्युत अध्यक्ष नरेंद्र पाटील हे मराठा आरक्षणाच्या मेळाव्यासाठी रविवारी नांदेडमध्ये होेते. या मेळाव्यात पाटील यांनी चव्हाण यांना त्यांच्याच गावात जाऊन जोरदार टीका केली होती. त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची चर्चा सुरू झाली. तुमच्या दहा पिढ्यांना आरक्षणाची गरज नाही पण गरिब मराठ्यांसाठी निर्णय घ्या, अशी टीका पाटील यांनी चव्हाण यांच्यावर केली होती.  या चर्चेत आता संभाजीराजे यांनीही प्रतिक्रिया किलेली आहे. सरकारने चुकीच्या वेळी संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय घेतल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडळाच्या सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला हा एक प्रकारे मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. अध्यक्ष नरेंद्र पाटील गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत होते. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. आतापर्यंत ११ हजार मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली होती. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. महामंडळ अजून गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जबाबदारी सांभाळण्यास सांगितले असल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. पण, आता अचानक मंडळ बरखास्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यामुळे येणारा आगामी काळ नरेंद्र पाटलांना डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख