कोरोना आटोक्यात येईना : मुंबईत मध्यरात्रीपासून संचारबंदी; पुण्यातही आदेश निघणार - mumbai police impose curfew in contentment zone pune soon follow | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना आटोक्यात येईना : मुंबईत मध्यरात्रीपासून संचारबंदी; पुण्यातही आदेश निघणार

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

पुणे आणि मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्णय घेतला. 

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींना घराबाहेर पडण्यास बंद घालणारा आदेश मुंबई पोलिसांनी लागू केला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये कर्फ्यू म्हणजे संचारबंदीच लागू झाली आहे. कंटेन्मेंट झोनबाहेर अत्यावश्यक सेवा म्हणजे शासकीय सेवा, खाद्य, बॅंकिंग, मेडिकल, आयटी, माध्यमे, बंदरे सुरू राहतील. इतक्याच बाबींसाठी नागरिकांना घराबाहेर पडता येईल. याचा अर्थ हा लाॅकडाऊन असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 17 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. 

सरकारने आदेश देताना यात लाॅकडाऊन असे कुठेही म्हटलेले नाही. मात्र आदेशाचे स्वरूप पाहता अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करणार हा आदेश आहे. मुंबईचे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी आयुक्तांच्या नावाने हा आदेश लागू केला आहे. मुंबईसोबतच पुण्यातही अशाच प्रकारचा आदेश लागू करणार असल्याचे पालिका आणि पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबतचे निर्णय स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. मुंबईतील काही भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, हे स्पष्ट आहे. तसेच मराठा आरक्षण, शिक्षकांचे प्रश्न, दूधदरवाढ, कांदा निर्यातबंदी अशा विविध विषयांवर राजकीय आंदोलने पण होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर ताण येत असल्याचे कारणही या संचारबंदीमागे असल्याचे बोलले जाते. 

कोरोनामुळे पुण्यात मुंबईच्या धर्तीवर नागरिकांसाठी आचारसंहीता काढली जाणार आहे. दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही.आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही. कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. पुणे महापालिकेकडून याबाबत शुक्रवारी आदेश काढण्यात येणार आहे.

 

Image

Image

१७ सप्टेंबर रोजी पुण्यातील स्थिती
.......
- दिवसभरात १९६४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात २२१९ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात ६२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १७ रूग्ण पुण्याबाहेरील.
- ९३९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १२६५३२.
- पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या- १७३७२.
- एकूण मृत्यू -२९६३.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १०६१९७.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६५४९.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख