minister balasaheb thorat decides to stay quarantine | Sarkarnama

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 7 जुलै 2020

राज्यातील चौथ्या मंत्र्यांच्या घरात कोरोना

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मुंबई बंगल्यातील टेलिफोन आॅपरेटर कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने थोरात यांनीही होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. थोरात यांनी कोरोनाची चाचणी केली असून तिचा अहवाल संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे. थोरात हे मुंबईकील `राॅयल स्टोन` या बंगल्यात वास्तव्यास आहेत.

राज्य मंत्रिमंडळातील अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. हे तिघेही यावर मात करून आता दैनंदिन कामकाजात नेहमीप्रमाणे सहभागी होत आहेत. थोरात हे गेले काही दिवस सातत्याने फिरत आहेत. निसर्ग चक्रीवादळानिमित्त त्यांनी कोकणचा दौरा केला. तसेच संगमनेरसह राज्याच्या इतर भागांतील कोरोनाची स्थिती पाहण्यासाठी ते दौऱ्यावर होते. 

राज्यात कोव्हिड-19 प्रादुर्भावाचा जोर वाढला असून, सोमवारी (ता. 6 जुलै) दिवसभरात 5368 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाख 11 हजार 987 झाली आहे. आणखी 204 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 9026 वर पोचला आहे. राज्यात एकूण 86,040 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

सोमवारी राज्यात एकूण 204 कोरोनाबळींची नोंद झाली. त्यापैकी मुंबईत 39, ठाणे जिल्ह्यात 75, पुणे मंडळात 28, औरंगाबाद मंडळात 12, नाशिक मंडळात 39, कोल्हापूर मंडळात दोन, लातूर मंडळात चार, अकोला मंडळात चार, नागपूर मंडळात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के आहे. आतापर्यंत 11 लाख 35 हजार 447 रुग्णांच्या नमुन्यांपैकी दोन लाख 11 हजार 987 म्हणजे 18.67 टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सहा लाख 15 हजार 265 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि 46 हजार 355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख