MMRDA चे शंभर कोटी ढापून लंडनमध्ये मालमत्ता खरेदी : सरनाईक प्रकरणी सोमय्यांचा आरोप - kirit somaiya alleges Rs 100 crore fraud in MMRDA | Politics Marathi News - Sarkarnama

MMRDA चे शंभर कोटी ढापून लंडनमध्ये मालमत्ता खरेदी : सरनाईक प्रकरणी सोमय्यांचा आरोप

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

सोमय्या यांच्या आरोपामुळे आता नवा वाद

मुंबई : मुंबई महानगर प्राधिकराणाचे तब्बल शंभर कोटी रुपये ढापल्याचा नवा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करून पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. त्यातून लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला आहे. हे उघड होऊ नये म्हणून सेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीमार्फत असलेली चौकशी रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोमय्या यांनी टाॅप सिक्यरिटीजने हा घोटाळा केल्याचे म्हटले आहे. तसेच सरनाईक यांची ईडी करत असलेली चौकशी ही मुंबई पोलिसांनी  दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे होत असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांना हे माहीत असेल, अशी आशा आहे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.  याबाबत सोमय्या हे स्वतः यलो गेट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याच्या तपासाबाबत अधिक माहिती घेणार आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्या पैशातून लंडन आणि विदेशात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या पैशाचे लाभार्थी कोण? याचा शोध ईडी घेत आहे. त्या संदर्भातच ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर ठाकरे सरकार एवढे आढेवेढे का घेत आहे?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दुसरीकडे शिवसेना आमदार सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.

ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली. काल (बुधवारी) प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख