फडणवीस आणि संजय राऊत भेटताच महाआघाडी सरकारला धक्का बसण्याची चर्चा - As Fadnavis and Sanjay Raut meet, there is talk of a shock to Mahaaghadi govt | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस आणि संजय राऊत भेटताच महाआघाडी सरकारला धक्का बसण्याची चर्चा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

भाजप आणि सेनेतील कटुतेचे संबंध लक्षात घेता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या उभयतांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता आहे की काय, अशी शंका बोलून दाखवली जात आहे. मात्र शिवसेनेतील नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महाआघाडी सरकार स्थिर असून अजिबात धोका नसल्याचा दावा केला आहे. 

फडणवीस आणि राऊत यांची हाॅटेल ग्रॅड हयातमध्ये दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ही भेट झाली. या वेळी भाजपकडून किंवा सेनेकडून इतर कोणीही नेते उपस्थित नव्हते. या दोघांमधील चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यातील सध्याचे कटुतेचे संबंध लक्षात घेता हे दोन नेते भेटणे महत्त्वाचे मानले जात आहे.

संजय राऊत हे विविध निमित्ताने मोदी सरकारवर टीका करत असतात. तसेच भाजपचे नेतेही सुशांतसिंह आत्महत्येच्या प्रकरणाच्या निमित्ताने थेट `मातोश्री`कडे बोट दाखवत असतात. या वातावरणात या दोन नेत्यांची भेट म्हणजे पुन्हा सलोख्याचे प्रयत्न आहेत की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्रिपदाची अट ठेवली होती. त्या अटीस भाजप मान्य झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेता शपथविधी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा घडामोडी होऊन शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे महाआघाडी सरकार स्थापन झाले. हे सरकार पडणार, अशा घोषणा भाजपचे नेते अधुनमधुन करत असतात. मात्र हे सरकार स्थिर असल्याचा दावा तीनही पक्षांचे नेते त्यानंतर करतात. आता थेट फडणवीस आणि राऊत यांची भेट झाल्याने राजकारणात पुढे काय घडणार, याविषयी चर्चांना ऊत आला आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीची भाजपची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार उभे करणार की नाही, याचीही चाचपणी फडणवीस यांनी या भेटीत केली असल्याचा अंदाज आहे. शिवसेनेने येथे उमेदवार उभे करू नये, अशीही गळ त्यांनी राऊत यांना घातली असावी, अशी शक्यता आहे. मात्र यावर अधिकृत भाष्य येत नाही तोपर्य़ंत महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या अटकळी थांबणार नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख