परमबीरसिंहांनी 16 आणि 19 मार्च या दिवशी चॅट केले आणि 20 मार्चला धमाका उडवला! - ex mumbai cp Parambirsingh chats for two days and blast on March 20 | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीरसिंहांनी 16 आणि 19 मार्च या दिवशी चॅट केले आणि 20 मार्चला धमाका उडवला!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 मार्च 2021

वाझे यांना अटक केल्यानंतरच ते का बोलले नाहीत, असा देशमुखांचा सवाल...

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे, अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

अनिल देशमुख यांनी काही प्रश्न विचारले आहेत. 

- सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ? 

- आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्चला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅवरून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? 

- 18 मार्च रोजी मी एका कार्यक्रमांमध्ये परमबीरसिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

- पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. 

- परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. 

- स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.

- सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? 

- विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे मा. मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, असे मुद्दे मांडण्यात आहेत.

परमबीरसिंह आणि एसीपी पाटील यांच्यात काय संभाषण झाले?

१६ मार्च रोजी झालेलं संभाषण : 

परमबीर सिंह : पाटील तू गृहमंत्री आणि पलांडे यांना फेब्रुवारीत भेटला तेंव्हा किती बार,  रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणे त्यांनी सांगितली होती 
परमबीर सिंह : आणि एकूण किती पैसे जमा करायला सांगितले होते. 
परमबीर सिंह : जरा पटकन...
ACP पाटील : मुंबईतील १ हजार ७५० बार्स, रेस्टॉरंट्स आणि इतर काही बाबी. प्रत्येकी ३ लाख रुपये
ACP पाटील :  महिन्याकाठी एकूण ५० कोटी जमा झाले पाहिजेत
परमबीर सिंह : आणि वाझे भेटलेले ती तारीख काय होती 
ACP पाटील :  सर मला तारीख नक्की आठवत नाही 
परमबीर सिंह : तुम्ही म्हणालात तुमच्या भेटीआधी काही दिवस 
ACP पाटील : हो सर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी 
महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ! गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंह यांचे वसुलीचे आरोप

१९ मार्च रोजी झालेलं संभाषण : 

परमबीर सिंह : पाटील मला आणखी काही माहिती हवी आहे 
परमबीर सिंह : गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर तुला वाझे भेटले होते का ? 
ACP पाटील :  हो सर गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर वाझे मला भेटले होते
परमबीर सिंह : गृहमंत्र्यांनी का बोलावलं, ते तुला सांगितलं का ? 
ACP पाटील :  त्यांनी मला सांगितलं भेटीचे कारण, १ हजार ७५० ठिकाणांहून ३ लाख रुपयांप्रमाणे महिन्याकाठी ४० ते ५० कोटी जमा करायला सांगितले होते. 
परमबीर सिंह : अरे ! हे तुला जे सांगितलं तेच त्याला देखील सांगितलं 
ACP पाटील :  चार मार्चला त्यांचा सहाय्य्क पलांडे यांनीही मला हेच सांगितलं
परमबीर सिंह : म्हणजे पलांडे यांना तू ४ मार्चला भेटलास 
ACP पाटील :  हो सर मला बोलावलं होतं

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख