बड्या नेत्याच्या नातेवाईकाच्या जरंडेश्वर कारखान्यावर 'ईडी'ची जप्ती - ED has attached assets of Jarandeshwar Sahkari Sugar Mill | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

बड्या नेत्याच्या नातेवाईकाच्या जरंडेश्वर कारखान्यावर 'ईडी'ची जप्ती

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील चिमणगांवमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आहे.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याभोवतीचा सक्तवसुली संचालनालयाचा (ED) फास आवळत चाललेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नेत्याच्या नातेवाईकांची मालकी असलेल्या जरंडेश्वर कारखान्यावर (ED) ईडीने आज जप्तीची कारवाई केली. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचे समजते. या कारवाईमुळं सहकार क्षेत्रासह राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. (ED has attached assets of Jarandeshwar Sahkari Sugar Mill)
 
ईडीने ट्विट करून कारखान्याच्या जप्तीची माहिती दिली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील चिमणगांवमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित मनी लाँर्डींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलं आहे. राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता ईडीनेही कारखान्यावर जप्ती आणत मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत. 

हेही वाचा : रोहित पवार, चाकणकर यांच्यासोबत फोटोत असलेल्या अमितनेच केली दगडफेक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य बँकेतील घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील अनेक कारखान्यांनी बँकेकडून कर्ज घेत ते बुडवल्याने बँकही बुडाली. काही साखर कारखान्यांची कमी भावात विक्री झाल्याचेही नंतर स्पष्ट झालं. या प्रकरणावरून राज्यात मोठे राजकारणही झाले.

जरंडेश्वर कारखान्यावर आधी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ होते. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या सोमेश्वर कारखान्याने हा कारखाना चालवायला घेतल्यानंतरही त्याची स्थिती सुधारली नाही. त्यामुळे राज्य बँकेनं हा कारखाना विक्रीला काढला होता. 

राज्य बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ, भाजपचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांची नावे होती. हे सर्वजण त्यावेळी बँकेवर संचालक होते. घोटाळ्याचे प्रकऱण समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने 2011 मध्ये संचालक मंडळ बरखास्त केले. या प्रकरणात संचालक मंडळावर फसवणुकीसह अन्य गंभीर खुनाचे गुन्हेही दाखल करण्यात आला होते. पण पाच महिन्यांपूर्वीच पवारांसह इतरांनाही क्लीन चीट देण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख