ड्रग्ज प्रकरणी आणखी तीन अभिनेत्रींना समन्स? - Three More Actresses summoned by NCB | Politics Marathi News - Sarkarnama

ड्रग्ज प्रकरणी आणखी तीन अभिनेत्रींना समन्स?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

बाॅलीवूडची अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केल्यानंतर आता बाॅलीवूडमधील ड्रग कनेक्शनचा पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी तीन अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावली आहेत

मुंबई : बाॅलीवूडची अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केल्यानंतर आता बाॅलीवूडमधील ड्रग कनेक्शनचा पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी तीन अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावली आहेत. या व्यतिरिक्त पुढील काळात आणखी काही तारक-तारकांना एनसीबीला सामोरे जावे लागण्याशी शक्यता आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना रिया चक्रवर्तीचे ड्रग कनेक्शन समोर आले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सध्या ती भायखळा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या चौकशीत आणखी काही नावे समोर आली आहेत. त्यापैकी सारा अली खान, राकुल प्रितसिंग, सिमोन खंबाटा या ती अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. 

अभिनेत्री कंगना राणावतनेही बाॅलीवूड आणि ड्रग्ज यांचा संबंध उघड करताना अनेक ट्वीट केली होती. त्यात तिने अनेक आघाडीच्या अभिनेत्यांची नांवेही घेतली होती. 

दरम्यान, रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अंमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयासमोर सांगितले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाची चौकशी पूर्ण झाली आहे. सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती.

दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. रियावर तिच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख