`दोघांना अटक झाल्याने या गुन्ह्यातून वाचणे परमबीरसिंगांना शक्य नाही`

खंडणीचे मोठे रॅकेट उघडकीस...
Parambirsingh
Parambirsingh

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Ex Mumbai CP Parambirsingh)  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांच्याविरोधात आता खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सिंग यांच्यासोबत सहा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संजय पूनमिया (वय ५५) व सुनील जैन (वय ४६) या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याने परमबीरसिंगांनाही अटक होऊ शकते. आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटकेपासून बचाव करण्यात परमबीरसिंग यांना यश आले आहे. या गुन्ह्यात मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले. 

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी आपल्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी परमबीर सिंग व अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याची तक्रार मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोकरे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारीनुसार बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांनी भागीदारीत २००८ मध्ये दोन कंपन्या सुरू केल्या होत्या; मात्र दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्याने ही भागीदारी २०११ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर संजय पुनामिया यांनी मुंबईसह इतर जिल्ह्यांत अग्रवाल यांच्याविरोधात १८ गुन्हे नोंदवले होते. २०१६ मध्ये संजय पुनामिया यांनी अग्रवाल यांच्याविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या वेळी अग्रवाल न्यायालयीन कोठडीत होते. नंतर पुनामियांतर्फे मनोज घटकर याला अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवालकडे पाठवण्यात आले. घटकरने पुनामिया हे परमबीर सिंग यांचे आर्थिक व्यवहार पाहतात, अग्रवाल यांची गुन्ह्यांमधून सुटका करण्यासाठी त्यांनी पुनामिया व परमबीर सिंग यांना काही जागा विकाव्यात व १५ कोटी ५० लाख रुपये द्यावेत, असे घोटकरने सांगितले. तसे न केल्यास पुढील पाच वर्षे जेलमध्ये राहावे लागेल, अशी धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या ३० मार्च रोजी संजय पुनामिया यांनी संबंधित मालमत्तेच्या करारावर जबरदस्ती शरद अग्रवाल यांच्या सह्या घेतल्या, तसेच उपायुक्त अकबर पठाण यांनाही पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर अकबर पठाण यांनीही ५० लाखांची मागणी केली. तसेच भाईंदरमधील दोन बीएचके फ्लॅट नावावर करण्यास धमकावले. तसे न केल्यास मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

परमबीर सिंगांच्या घरीही भेट
परमबीर सिंग यांच्या घरीही शरद अग्रवाल यांनी भेट दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार त्या वेळी सिंग यांच्यासोबत उपायुक्त दर्जाचा अधिकारीदेखील उपस्थित होता. बैठकीनंतर अटक टाळण्यासाठी अग्रवाल यांनी पुनामियाला १५ कोटी ५० लाखांचा धनादेश व २५-२५ लाख दोन हप्त्याने दिले. त्यानंतर पुनामिया अग्रवालला एसीपी श्रीकांत शिंदेकडे घेऊन गेले. मोक्का गुन्ह्यात मदतीसाठी श्रीकांत शिंदेंना २५ लाख देण्यासाठी दटावले. त्यानुसार अग्रवालने २५ एप्रिल २०२१ रोजी ते पैसे संजय पुनामिया यांच्याकडे दिले. त्यानंतर परमबिर सिंग व पुनामिया यांच्यात झालेल्या सेटलमेंटनुसार अग्रवाल यांच्याकडे ११ कोटींसाठी पुनामियाने तगादा लावला. या वेळी पुनामियाने पोलिसांची मदत घेऊन कुटुंबियांवर पाळत ठेवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

खोटे दस्तावेज बनवत मालमत्ता हडपली
अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलमार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली मोक्काचा गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी मुंबई पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच पुतण्याची सही घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com