हो, नाही करता उर्मिला मातोंडकर यांना आमदार करण्याचे सेनेचे ठरले... - urmila matondkar accepts mlc offer from shivsena says sources | Politics Marathi News - Sarkarnama

हो, नाही करता उर्मिला मातोंडकर यांना आमदार करण्याचे सेनेचे ठरले...

राजू सोनवणे
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

मातोंडकर यांच्या नावाने राजकीय वर्तुळात आज दिवसभर चर्चा सुरू होती....

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेकडून आमदारकी स्वीकारणार की यावर पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण उर्मिला यांनी शिवसेनेची आॅफर स्वीकारली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शिवसेनेकडून अद्याप यावर थेटपणे घोषणा करण्यात आलेली नसली तरी मातोंडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. शिवसेना नेत्यांना याबाबत आज दिवसभर विचारले असता त्यावर विसंगत उत्तर मिळेत होती. संजय राऊत यांनी आपण याबाबत ऐकले असल्याचे उत्तर दिले होते. परिवहनमंत्री अनिल परब यांनी उर्मिला यांना आॅफर दिली नसल्याचा दावा केला होता. आता पुन्हा मातोंडकर यांना आमदार करण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले. मातोंडकर यांचे नाव काॅंग्रेसकडून येणार असल्याची आधी चर्चा माध्यमांत होती. मात्र अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  त्यांच्याशी बोलल्याचे समजल्याने काॅंग्रेसच्या नेत्यांनाही धक्का बसला. 

राज्यपाल कोट्यातून कला आणि समाजसेवा या क्षेत्रांतील व्यक्तींना आमदार म्हणून विधान परिषदेवर नेमता येते. त्यासाठीच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांनी प्रत्येकी चार नावे सुचविली आहेत. या नावांचा लिफाफा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही नावे थेट राज्यपालांना देण्यात येणार आहेत. शिवसेनेकडून मातोंडकर यांच्याशिवाय अभिनेता सुबोध भावे, समाजसेविवा सिंधूताई  सपकाळ यांचीही नावे देण्यात येणार नसल्याची आतारपर्यंत चर्चा आहे. राजकीय नेत्यांमध्ये सचिन अहिर, सुनील शिंदे यांचीही नावे असल्याचे सांगण्यात आले. 

राष्ट्रवादीची नावे ठरली असून त्यात एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे, नांदेडचे डाॅ. यशपाल भिंगे यांची नावे आहेत. काॅंग्रेसकडून सत्यजित तांबे, नसीम खान, मुजफ्फरखान, सचिन सावंत यांच्या किंवा इतर नावांची शिफारस केल्याचे सांगण्यात येत आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख