पाच महिन्यांच्या तीरा कामतसाठी नरेंद्र मोदी, फडणवीस यांची तत्परता.. - PM Narendra Modi and Fadnavis act fast for medicine of six month old girl | Politics Marathi News - Sarkarnama

पाच महिन्यांच्या तीरा कामतसाठी नरेंद्र मोदी, फडणवीस यांची तत्परता..

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

पंतप्रधानांनी अतिशय संवदेनशीलतेने पुढाकार घेत त्वरेने कारवाई केल्यामुळे निश्चितपणे तीरा कामत हिचे प्राण वाचतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई : मुंबईतील एका पाच  महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधे अमेरिकेतून आयात करण्यासाठी सरकार यंत्रणा किती वेगाने हळू शकते, याचे उदाहरण दिसून आले. या औषधासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय त्वरेने केंद्र सरकारने घेतला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. हे काम त्वरेने मागे लागले.

तीरा कामत ही मुंबईतील 5 महिन्यांची बालिका असून, तिला जीन रिप्लेसमेंट उपचारांची गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आणि यासाठी सुमारे 16 कोटी रूपये गोळा करण्यात आले. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे 6.5 कोटी रूपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

त्यामुळे या औषधावरील या सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली. पंतप्रधान मोदी यांनी निर्देश देताच, तातडीने त्यावर कार्यवाही झाली आणि त्यानुसार, आज 9 फेब्रुवारीला या औषधापुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला. पंतप्रधानांनी अतिशय संवदेनशीलतेने पुढाकार घेत त्वरेने कारवाई केल्यामुळे निश्चितपणे तीरा कामत हिचे प्राण वाचतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच या त्वरित कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. तीराला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

अवघ्या पाच महिन्यांच्या तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी हा दुर्धर आजार झाला. हाजीअली येथील एमआरसीसी या लहान मुलांच्या रुग्णालयात चिमुकल्या तीरावर उपचार सुरू आहेत. या आजारावर भारतात उपचार उपलब्ध नाहीत. अमेरिकेतच यावर उपचार आहेत. स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी हा आजार जनुकीय बदलांमुळे होतो. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे रुग्णाला हालचाल करणेही कठीण होऊन बसते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख