तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री की मुंबईचे : पडळकरांचा खोचक सवाल 

आजच्या तारखेत देखील मुंबई आणि राज्यातील इतर जिल्ह्यांबाबत भेदभावच करण्यात येत आहे.
Bjp Mla Gopichand Padalkar Letter to Cm News Mumbai
Bjp Mla Gopichand Padalkar Letter to Cm News Mumbai

मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील मोफत कोरोना लस, आॅक्सिजन बेड, आयसीयू खाटा, व्हेंटिलेटर व इतर सुविधांमधील आकेडवारीची तफावत समोर आणली आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर भागात भविष्यात आणखी कमतरता जाणवेल असे देखील एका बैठकीचा हवाला देत निदर्शना आणून दिले आहे. यावरून पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. तुम्ही मुंबईचे मुख्यमंत्री आहात की महाराष्ट्राचे, असा खोचक सवाल देखील पत्र पाठवून केला आहे.

पडळकर यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले  आहे की, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी, राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार दिनांक २८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील ५ कोटी ७१ लाख लोकांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.  माझी मागणी मान्य केल्याबद्दल मी आपले आभार मानतो.  तसेच मी आपणांस सुचवतो की आपण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मोफत लसीकरणाच्या बाबत सविस्तर खुलासा करावा, १८-४५ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरणा बाबतींचे शासकीय धोरण निश्चित करून जिल्हानिहाय तारखेसह ते त्वरित प्रकाशित करावे.

सदर बैठकीच्या वेळी सार्वजनिक आरोग्य विभागाने सादरीकरण केले. त्यात देण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारेच मी आपणास हे पत्र लिहीत आहे. या पत्रातील कोणतीही आकडेवारी मी माझ्या खिश्यातून काढलेली नाही किंवा हाताची लावलेली नाही. या सादरीकरणानुसार येत्या ११ मेपर्यंत राज्यात कोरोनाचे २ लाख ४३ हजार सक्रिय रुग्ण वाढणार आहेत. अंदाजित रुग्ण संख्या किती असेल याची माहिती देतानाच आयसोलेशन खाटा कुठे अतिरिक्त असतील आणि कुठे तुटवडा असेल याची माहितीही देण्यात आली आहे.

या आकडेवारीवर नजर टाकली असता हे सरकार केवळ मुंबईसाठी काम करते की संपूर्ण राज्यासाठी असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात निर्माण झाला आहे. ११ मे रोजी राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण असतील आणि त्यांच्यासाठीची वैद्यकीय सुविधा किती प्रमाणात उपलब्ध असेल याची जी आकडेवारी सादरीकरणात देण्यात आली ती बघता महाविकास आघाडी सरकारने फक्त मुंबईवरच लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसते.

११ मे रोजी मुंबईत ६४५६० सक्रिय रुग्ण असतील त्यांच्यासाठी २६२१६ आयसोलेशन खाटा, ४२०० ऑक्सीजन खाटा ११२९ आयसीयु खाटा तर ९२३ व्हेंटिलेटर अतिरिक्त उपलब्ध असतील असे म्हटले आहे. आता मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाण्याची परिस्थिती बघा ११ मे रोजी तेथे ७९०९५ सक्रिय रुग्ण असतील मात्र १४४३० आयसोलेशन खाटा, २२६१ ऑक्सिजन खाटा यांची कमतरता असेल. पालघरमध्ये तर आणखीच वाईट परिस्थिती राहील तेथे २३९६७ सक्रिय रुग्ण असतील, आयसोलेशन खाटा ५७२६, ऑक्सीजन खाटा २९४ आयसीयू खाटा २७३ व्हेंटिलेटर २४ ने कमी असतील.

इतर जिल्ह्यांबाबत भेदभाव?

पुण्यामध्ये आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याचा दावा केला जात असतानाच ११ मे रोजी तेथे  १२०२७६ रुग्ण असतील आणि आयसोलेशन खाटा २६३४५ ने तर ऑक्सिजन खाटा ४०९७ ने कमी असतील असे या  सादरीकरणात म्हटले आहे. नागपूर बाबतची आकडेवारी तर आणखी धक्कादायक आहे. ११ मे रोजी तेथे ११३०९३ रुग्ण असतील. आयसोलेशन खाटांचा तब्बल ४६५८३ ने ऑक्सीजन खाटांचा १६७९ ने आयसीयू खाटांचा १९४७ ने, व्हेंटिलेटरचा ४४५ ने तुटवडा असेल.

नाशिक मध्ये परिस्थिती वेगळी नाही,  तेथे ११ मे रोजी ९५१९६ सक्रिय रुग्ण असतील, आयसोलेशन खाटा ३८६१५ ने ऑक्सीजन खाटा ६३५३ आयसीयु खाटा १५३५ ने तर व्हेंटिलेटर २७ ने कमी असतील. मुंबई वगळता चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सीजन, व्हेंटिलेटरची प्रचंड कमतरता असल्याचे ही आकडेवारी स्पष्टपणे सांगते.

आजच्या तारखेत देखील मुंबई आणि राज्यातील इतर जिल्ह्यांबाबत भेदभावच करण्यात येत आहे. आपणांस मी आठवण करून देतो की आपण केवळ मुंबईचे नाही तर अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि अशी अपेक्षा करतो की याची ग्वाही महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपण राज्याला उद्देशून करणार असलेल्या भाषणात येईल, अशी अपेक्षा महाराष्ट्राचा सेवक गोपीचंद पडळकर करत असल्याचे नमूद केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com