प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे हुतात्म्यांबाबत उदासीन का ? - why are those who tell legacy of prabodhankar and chavan indifferent about martyrs | Politics Marathi News - Sarkarnama

प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे हुतात्म्यांबाबत उदासीन का ?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 1 मे 2021

अधिकाऱ्यांनी दिवसभर तेथे बसून संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत त्यावेळच्या बातम्या-साहित्य यांचे वाचन करून आत्मपरीक्षण करून नंतर निर्णय घ्यावा. त्यामुळे तरी या अधिकाऱ्यांना सुबुद्धी सुचेल, अन्यथा आपणच पुढाकार घेऊन हुतात्म्यांच्या वारसांना सदनिका द्याव्यात.

मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या १०६ जणांच्या वारसांना घरे देण्याबाबत निर्णय न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना हुतात्मा चौकात दिवसभर उन्हात बसवून या प्रस्तावावर विचार करायला लावावा, अशी सूचना भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे हुतात्म्यांच्या वारसांना घरे मिळावीत, यासाठी का मागे हटत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी ही सूचना केली आहे. या हुतात्म्यांच्या वारसांना घरे मिळावीत, यासाठी सामंत पहिल्यापासून आग्रही आहेत. गेली अनेक वर्षे हा विषय महापालिकेच्या विधी समितीत आणि सर्वसाधारण सभेत मांडूनही यासंदर्भात प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. महापालिका प्रशासन या १०६ हुतात्म्यांचे बलिदान विसरले आहे. किंबहुना प्रशासनाने त्याकडे मुद्दाम व उद्दामपणे दुर्लक्ष केले आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

या विषयावर प्रशासनाने आतापर्यंत वेगवेगळे अभिप्राय दिले आहेत. अशा प्रकारची बाब महापालिकेच्या अधिकारकक्षेत येत नाही, त्यामुळे हे धोरण राज्य सरकारने ठरवावे, महापालिका असे धोरण ठरवू शकते, महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी होऊ शकते, असे वेगवेगळे अभिप्राय प्रशासनाने या विषयावर दिल्याचेही सामंत यांनी दाखवून दिले आहे. 

आजपर्यंत मुंबईत अनेकदा अवैध बांधकामे क्षमापात्र झाल्यावर किंवा अनधिकृत झोपडीधारकांना सदनिका दिल्या गेल्या. मात्र या हुतात्म्यांच्या वारसांना उपेक्षित ठेवले गेले, असेही सामंत यांनी म्हटले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी प्रबोधनकार ठाकरे आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे सरकार सध्या महाराष्ट्रात आहे. तरीही महापालिका प्रशासन या प्रश्नावर चालढकल करीत आहे, ही खेदाची बाब आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

हेही वाचा : अबब...24 तासांत चार लाख रुग्ण अन् साडेतीन हजार मृत्यू; भारताने मोडले जागतिक उच्चांक

त्यामुळे या प्रश्नावर विचार करून निर्णय घेण्याला जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांना एक दिवस हुतात्मा चौकात कोणत्याही मंडप व इतर सोयींशिवाय (उन्हात) बसवावे. या अधिकाऱ्यांनी दिवसभर तेथे बसून संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत त्यावेळच्या बातम्या-साहित्य यांचे वाचन करून आत्मपरीक्षण करून नंतर निर्णय घ्यावा. त्यामुळे तरी या अधिकाऱ्यांना सुबुद्धी सुचेल, अन्यथा आपणच पुढाकार घेऊन हुतात्म्यांच्या वारसांना सदनिका द्याव्यात. तरच या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळेल, असेही खडे बोले सामंत यांनी सुनावले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख