कोविडसाठीचा निधी बजेटच्या घोषणेसारखा न ठेवता तात्काळ वापरा.. - Use the funds for Kovid immediately without keeping the budget announcement. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोविडसाठीचा निधी बजेटच्या घोषणेसारखा न ठेवता तात्काळ वापरा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

बारा बलुतेदार, छोटे व्यवसायीक, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या.

मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू केल्याची घोषणा केली. ही घोषणा करतांनाच हातावर पोट असणारे, फेरीवाले, रिक्षाचालक निराधार महिला यांच्यासाठी देखील आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्यातील कोविड प्रतिबंधक उपाय योजनांसाठी तीन हजार तीनशे कोटींचा निधी देखील राखीव ठेवण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकराला काही सूचना केल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल. 

कोविड प्रतिबंधासाठी जो ३३०० कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे.

राज्यात संचारबंदीचा निर्णय जाहीर करतांना काही घटकांचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी बहुतांश घटक यापासून वंचित राहिला आहे, याकडे देखील फडणवीसांनी सरकारचे लक्ष वेधले. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायीक, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली.

वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी असल्याचेही फडणवीस म्हणाले

Edited By : Jagdish Pansare 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख