शिवसेनेने काॅंग्रेस आणि सपाला डिवचले.. - Shiv Sena ditches Congress and SP | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेने काॅंग्रेस आणि सपाला डिवचले..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 मे 2021

महापालिकेच्या २०१० च्या धोरणानुसार परदेशी व्यक्तीचे नाव सार्वजनिक ठिकाणी देत नाही; मग हा निर्णय कसा घेतला, असा प्रश्‍नही रईस शेख यांनी केला होता.

मुंबई : कुलाब्यातील काळा घोडा परिसरातील चौकाला इस्राईलचे दिवंगत पंतप्रधान शिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा शिवसेनेचा ठराव महापालिकेच्या महासभेत फेरविचारासाठी मांडण्यात आला आहे. चौकाला सिमॉन यांचे नाव देण्यास काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने विरोध केला होता. (Shivsena, Congress And Samajwadi Party Dispute on Giving Name of israels PM) या ठरावाचा फेरविचार करण्याची मागणीही दोन्ही पक्षांकडून करण्यात आली होती.

काळा घोडा परिसरातील रजनी पटेल मार्ग आणि सोरबजी टाटा मार्ग या मार्गांना छेदणाऱ्या चौकाला शिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा ठराव शिवसेनेच्या सुजाता सानप यांनी महासभेत मांडला होता. मार्च २०२० मध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानंतर या चौकाला शिमॉन पेरेस यांच्या नवाचा नामफलकही लावण्यात आला.

नंतर त्यावर आक्षेप घेत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून हा फलक हटविण्याचे आदेश पालिकेला द्यावेत, अशी मागणी केली होती. या पत्रानंतर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने पालिकेच्या महासभेत या ठरावाच्या फेरविचाराची मागणी केली.

महापालिकेच्या २०१० च्या धोरणानुसार परदेशी व्यक्तीचे नाव सार्वजनिक ठिकाणी देत नाही; मग हा निर्णय कसा घेतला, असा प्रश्‍नही रईस शेख यांनी केला होता. त्यामुळे आता यावरून शिवसेना आणि भाजप काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

महापौरांनी नाकारला होता प्रस्ताव

शिवसेनेकडून शिमॉन पेरिस यांच्या नामकरणाचा प्रस्ताव मांडण्यापूर्वीच २०१८ मध्ये भाजपकडून मरीन लाईन्स येथील चौकाला पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; मात्र गटनेत्यांच्या बैठकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने विरोध केल्याने तत्कालीन महापौर विश्‍वानाथ महाडेश्‍वर यांनी हा प्रस्ताव नाकारला होता.

हे ही वाचा : भाजपचं ठरलं; आसामच्या मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्वा सरमा

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख