रोहित पवार, राष्ट्रवादीकडे रेमडेसिविरचा साठा कुठून आला, नवाब मलिक हिशोब द्या

नवाब मलिक रोज उठसूठ विरोधकांवर आरोप करत आहेत, पण मुंबई बाॅबस्फोटातील आरोपींकडून जमीन कुणी घेतली, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.
Bjp Leader Pravin Darekar- Press Conference News Mumbai
Bjp Leader Pravin Darekar- Press Conference News Mumbai

मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या संकटात लोकांचे जीव वाचवण्यात अपयशी ठरत आहे. रुग्णांना इंजेक्शन नाही,आॅक्सीनज नाही, बेड मिळत नाही अशी परिस्थिती असतांना केवळ गलिच्छ राजकारण करून कायद्याचा गैरवापर केला जात आहे.  एकीकडे साठेबाजी केली म्हणून निरनिराळ्या लोकांवर कारवाई केली जाते, त्यांना रात्री घरातून उचलून नेले जाते. मग राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून शरद पवारांनी आमदार रोहित पवारांच्या हस्ते सोलापूरमध्ये जी रेमडेसिविर इंजेक्शन दिली, ती कूठून आली, याची चौकशी केली का? असा सवाल भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट असे चालणार नाही. नवाब मलीक यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन राज्यात किती रेमडिसिविरचा साठा आहे,  इंजेक्शन कोणत्या हाॅस्पीटलला दिली, महापालिकेला दिली आणि सध्या शिल्लक किती आहे, याचा लेखाजोखा मांडावा, असे आवाहन देखील दरकेर यांनी केले.

राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनची साठेबाजी आणि तुटवडा यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेऊन कारवाई केल्यानंतर भाजपचे नेते अधिक आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे महाविकास आघाडी सरकारवर खोटारडेपणा आणि राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत. तर त्याला राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे प्रत्युत्तर देत आहेत.

भाजपच्या एका कार्यकर्त्याकडे रेमडेसिविरचा साठा सापडल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्याला दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. दरेकर म्हणाले, नवाब मलिक हे घाणेरडे राजकारण करत आहेत. राज्याचे अन्न व औषध विभागाचे मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनीच सदर सापडलेला साठा हा सरकारकडे येणार होता, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नवाब मलिक व हे सरकार तोंडावर पडले असून त्यांच्याच मंत्र्यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. शिंगणे यांनी सत्य सांगितल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

रेमडेसिविर प्रकरण वाझे स्टाईलने हाताळले

रेमडेसिविरच्या प्रकरणावरून राज्य सरकार घाणेरडे राजकारण करत आहे. हे प्रकरण साचिन वाझे स्टाईलने हाताळले जात असून रेमडेसिविर पुरवणाऱ्या व्यक्तीचा मनसुख हिरेन करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला. नवाब मलिक यांनी आरोप करण्याआधी आपल्याकडे देखील चार बोटं आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे. रेमडेसिवरचा साठा केला असेल, पण ते लोकांना देऊन त्यांचे जीव वाचवणार होते. ज्यांच्या कुटुंबातील गरजू रुग्णांना ते मिळाले असते, त्यांचे जीव वाचल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला आशिर्वादच दिले असते.

पण तुम्ही कार्यवाही करण्याऐवजी कारवाईवर भर दिला. कुठल्याही व्यक्तीच्या जीवापेक्षा कायदा मोठा नसतो. एकीकडे साठेबाजी केली म्हणून तुम्ही कारवाई करता, मग सोलापूरात राष्ट्रवादी काॅंग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून शरद पवार  यांनी रोहित पवारांच्या हस्ते रेमडेसिविर पाठवले ती कुठून आली. याचा शोध किंवा चौकशी नवाब मलिक यांनी केली का?  बारामतीत पॅरासिटाॅमाॅल गोळ्यांचे पाणी रेमडेसिविरचे इंजेक्शन म्हणून विकतांना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पकडला गेला. त्याचे सगळे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत. त्याच्यावर काय कारवाई केली? मग आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही भूमिका कशी चालेल असा टोला देखील दरेकर यांनी लगावला.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर यांच्यावर उठसूठ आरोप केले जात आहेत. आपल्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडायचे आणि केंद्र मदत करत नाही असे सांगायचे असा प्रकार सरकारमधील मंत्र्यांनी चावला आहे.  उलट फडणवीस यांनीच केंद्रीय मंत्र्यांना भेटून राज्याला रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी कंपन्याना आदेश द्या, असे सांगितले होते.

बाॅम्ब स्फोटातील आरोपींची जमीन कुणी घेतली?

राज्यात आॅक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे केंद्राने आता दीडशे मेट्रिकटन आॅक्सिजन देण्याची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षाच्या वरील सर्वांना कोरोनाची लस येत्या १ मे पासून देण्याचा निर्णय घेतला. त्याचे कौतुक करायचे सोडून केंद्रावर सातत्याने टीका करण्याचे प्रकार राज्यातील  सत्ताधारी करत आहेत.

नवाब मलिक रोज उठसूठ विरोधकांवर आरोप करत आहेत, पण मुंबई बाॅबस्फोटातील आरोपींकडून जमीन कुणी घेतली, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती आहे म्हणून आम्ही शांत आहोत. लवकरच पुराव्यासहित आम्ही ते जनतेसमोर मांडू. तुर्तास नवाब मलिक यांनी राज्यातील रेमडेसिविरचा साठा, करण्यात आलेले वाटप याचा लेखाजोखा मांडावा, अशी मागणी देखील दरेकर यांनी यावेळी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com