राज्याला परिवहन मंत्री द्या, कलानगरमध्ये फिरणारा परिवार मंत्री नको

जम्बो कोविड सेंटरचा उल्लेख करून सरकार आपली पाठ थोपटवून घेत आहे, पण या सेंटरच्या उभारणीत सरकारमधील मंत्र्यांकडून मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे.
Bjp Mla Nitesh Rane- Ad. Anil Parab- Assembly News Mumbai
Bjp Mla Nitesh Rane- Ad. Anil Parab- Assembly News Mumbai

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना कोणी वाली नाही. राज्याला परिवहन मंत्री द्या, असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण सध्या जे आहेत, ते परिवहन मंत्री नाही, तर एका परिवाराचे मंत्री आहेत. ते कलानगर भागातच फिरत असतात, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे मंत्री अॅड.अनिल परब यांना नाव न घेता लगावला. यावेळी राणे यांनी राज्य सरकार, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अप्रत्यक्ष टिका केली.

विधीमंडळ अधिवेशनातील २९३ च्या प्रस्तावावर बोलतांना नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले होते. मुंबईतील नाईट लाईफ, जम्बो कोविड सेंटर उभारणीतील भ्रष्टाचार, युवासेनेचे सचिव वरुण देसाई यांचा मंत्रालयातील वावर, त्यांना पुरवण्यात आलेली वाय दर्जाची सुरक्षा आदी मुद्यावर राणे यांनी सरकारला धारेवर धरले.

नितेश राणे म्हणाले, वरुण देसाई कोण आहे? कशासाठी त्याला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ते मंत्रालयात-अधिकाऱ्यांच्या दालनात का फिरत असतात? ही सगळी नाईट लाईफ गॅग आहे. जम्बो कोविड सेंटरसाठीच्या साहित्य पुरवठ्याचे कंत्राट केतन कदम, आदित्य जव्हेरी, गोम्स यांनाच कसे मिळाले. ते कुणाचे मित्र आहेत. डिनो मोरिया हा चार-पाच चित्रपटात आलेला माणूस कोण आहे? त्याचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध, तो सरकारचा जावई आहे का? याची चौकशी व्हायला पाहिजे.

जम्बो कोविड सेंटरचा उल्लेख करून सरकार आपली पाठ थोपटवून घेत आहे, पण या सेंटरच्या उभारणीत सरकारमधील मंत्र्यांकडून मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. पाच- आठ हे सरकारचे आवडते आकडे आहेत, आता ते टक्के आहेत की आणखी काय? हे तुम्हीच ठरवा. सरकारमधील मंत्र्यांकडून अक्षरशः लूट सुरू असल्याचा आरोप देखील राणे यांनी केला.

आमच्या आमदारांनी यावर जाब विचारला की फोनवरून धमक्या दिल्या जातात. कुणाला टेंडर द्यायचे हे रिझवी काॅलेज जवळील बंगल्यात ठरवले जाते. तिथे मंत्र्यांच्या गाड्यांची गर्दी कशासाठी होते, असा सवाल देखील राणे यांनी उपस्थित केला.धारावी माॅड़ेलचे श्रेय सरकारकडून घेतले जाते. पण यात मुंबई महापालिकेचा काहीही संबंध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी या भागात केलेले काम आणि मेहनत यामुळे याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले.

त्यामुळे सरकारने किंवा मुंबई महापालिकेने फुकट याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला देखील राणे यांनी लगावला. राज्याचे परिवहन मंत्री हे एका परिवाराचे मंत्री आहेत, ते कलानगर भागातच फिरत असतात, असा टोला लगावत राज्याला परिवहन मंत्री द्या, असा चिमटा राणे यांनी अनिल परब यांचे नाव न घेता काढला.

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करणार का?

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सत्ताधारी पक्षांकडून केली जात आहे. पण डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण राज्यात दोन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या केल्या, मग मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल देखील राणे यांनी सभागृहात उपस्थित केला.

वन खात्याच्या जमीनीच जर मुख्यमंत्र्यांच्या नावावर केल्या जात असतील तर राज्यातील भ्रष्टाचारावर काय बोलणार? असे म्हणत कलानगर भागातील एका रुममध्ये हॅकर बसवण्यात आले असून ते विरोधकांवर लक्ष ठेवून असल्याचा आरोप देखील राणे यांनी केला.

गेल्या पाच दिवसांपासून मला बोलण्याची संधी कधी मिळते याची मी वाट पाहत होतो, आज सगळ बोलंलो, आज सुखाने झोपेन असा टोला लगावतांनाच धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, बाळासाहेबांचीच आम्हाला शिकवण आहे, त्यामुळे अंगावार आलात तर शिंगावर घेऊ, असा इशारा देखील राणे यांनी भाषणाच्या शेवटी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com