लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्हे वाढले; ४९४ प्रकरणात २६१ जणांना अटक - Cybercrime increased in lockdown; 261 arrested in 494 cases | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्हे वाढले; ४९४ प्रकरणात २६१ जणांना अटक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जून 2020

सर्वाधिक २०३ सायबर गुन्हे आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. त्या खालोखाल १९५ गुन्हे हे चुकीचे व दिशाभूल करणारे व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी दाखल झाले आहेत.

मुंबईः लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. या संकटाच्या काळातही काही गुन्हेगार व समाजकंटकांनी परिस्थितीचा गैरफायदा उचलत सायबर गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ४९४  गुन्हे दाखल करत २६१ व्यक्तींना अटक केली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही माहिती दिली. राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये २० जून पर्यंत एकूण ४९४ गुन्ह्यांची नोंद झाली असून यापैकी २२ एनसी आहेत.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, सर्वाधिक २०३ सायबर गुन्हे आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. त्या खालोखाल १९५ गुन्हे हे चुकीचे व दिशाभूल करणारे व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी दाखल झाले आहेत.

tiktok व्हिडिओ शेअर प्रकरणी २६ तर आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल ९ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा(ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ५७  गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणात २६१ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

बीडमध्ये ५२ गुन्हे..

बीड  जिल्ह्यातील सिरसाळा  पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या जिल्ह्यात नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५२ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या जातीय भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होती. त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख