मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजची अजित पवारांकडून अंमलबजावणी सूरू..

आदिवासी विभागांतर्गत खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे २४० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.
Minister Ajeet Pawar-  Cm Udhav Thackeray news Mumbai
Minister Ajeet Pawar- Cm Udhav Thackeray news Mumbai

 मुंबई : ‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले.

सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आदिवासी विभागाच्या १२ लाख लाभार्थ्यांना आगावू मदतीचे तात्काळ वितरण, बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगार, घरेलु कामगार, राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक यांच्यासह विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा निधी तात्काळ वितरित करावा. यासाठी आवश्यक शासन निर्णय, निधी वितरणाचे आदेश जारी झाले आहेत. उर्वरीत आदेशही तात्काळ जारी व्हावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रशासनाला दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजअंतर्गत देण्यात येणारी मदत संबंधित घटकांपर्यंत तात्काळ पोहचवण्याच्या कार्यवाहीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतील तीस टक्के निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याअंतर्गत ३ हजार ३३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार १०० कोटी रुपयांचा निधीचे वितरणही झाले आहे. पहिल्या टप्प्यातील निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व उपचारांसाठीच खर्च करण्यात यावा. उर्वरीत निधीही गरजेनुसार तातडीने वितरीत करण्यात यावा. 

अन्न सुरक्षा योजनेसाठी ९० कोटी

राज्यातील वाढती ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी ५ हजार ४७६ कोटी रुपये मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. याअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे, यासाठी ९० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

निर्बंधकाळात राज्यभर दररोज दोन लाख शिवभोजन थाळ्या मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी ७५ कोटी रुपये उपलब्ध केले जातील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील राज्यभरातील ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरीता प्रत्येकी १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यासाठी ९६१ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

रिक्षा, सायकल रिक्षाचालकांसाठी १८० कोटी

राज्यातील १२ लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजारांप्रमाणे १८० कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. राज्यातील २५ लाख नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी ३७५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील ५ लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे ७५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. १२ लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे १८० कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे. ही मदत देतांना सायकल रिक्षाचालकांचाही विचार करण्यात आला आहे.

आदिवासी विभागांतर्गत खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे २४० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. 
जिल्हा वार्षिक योजनेतील तीस टक्के निधी ‘कोविड’वरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी खर्च करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. राज्यभरासाठी ३ हजार ३०० कोटी रुपये एवढा निधी यासाठी उपलब्ध होणार आहे.

यापैकी पहिल्या टप्प्यात १ हजार १०० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत निधी आवश्यकतेनुसार वितरीत करण्यात येणार आहे. निर्बंधाच्या काळात राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील एकाही नागरीकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत युध्दपातळीवर काम करावे. उर्वरीत शासन निर्णय जारी करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. योग्य व गरजू लाभार्थ्यांपर्यंत मदत पोचविण्याची चोख व्यवस्था व्हावी. यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com