खासदार उदयनराजेंची तरुणांना अनोखी भेट; उभारणार स्पर्धा परिक्षा अभ्यासिका..... - MP Udayanraje's unique gift to the youth; Competitive examination study to be set up in Satara ..... | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार उदयनराजेंची तरुणांना अनोखी भेट; उभारणार स्पर्धा परिक्षा अभ्यासिका.....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

एमपीएससी, युपीएससी, आणि तत्सम स्पर्धा परिक्षांकरीता हायटेक ग्रंथालय, ई ग्रंथालय, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, एक-दोन दिवसीय चर्चासत्रे, शिबीरे, नामवंत वक्त्यांची व्याख्याने आदी विधायक आणि स्पर्धा परिक्षांना पुरक ठरणारे उपक्रम याठिकाणी राबविले जाणार आहेत. 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी युवकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सातारच्या आयुर्वेदिक गार्डनमध्ये 75 लाख रूपये खर्चून स्पर्धा परिक्षांना उपयुक्त ठरणारी सुसज्य लायब्ररी आणि अभ्यासिका उभारणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तो निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. 

यासंदर्भात ॲड. दत्तात्रेय बनकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, सातारच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणांत खासदार उदयनराजे भोसले यांच्या विषयी प्रचंड क्रेझ आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेक महाविद्यालयांना भेटी देवून, युवकांशी संवाद साधला होता. त्यावेळी युवकांच्या समस्यांविषयी चर्चा करताना, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास आणि त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भग्रंथ यांची युवकांना कमतरता जाणवत असल्याचे सांगण्यात आले.

साताऱ्यात सुसज्य अभ्यासिका आणि ग्रंथालय व्हावे अशी अपेक्षा अनेक महाविद्यालयीन युवकांनी व्यक्त केली होती. त्यावेळी अभ्यासिका उभारण्याबाबत उदयनराजे भोसले यांनी युवकांना आश्वासन दिले होते. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पालिकेच्या मालकीच्या प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज आयुर्वेदिक गार्डनमध्ये ग्रंथालय आणि अभ्यासिक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले.

आयुर्वेदिक गार्डनमध्ये सुमारे चार हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम उभारुन सुसज्य ग्रंथालय आणि स्पर्धा परिक्षा अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 75 लाख रूपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून याकामी निधी उपलब्ध करुन घेण्यात आला आहे. आयुर्वेदिक गार्डनमध्ये असणारे शांत,निसर्गसंपन्न आणि प्रसन्न वातावरण युवकांना सहाय्यभुत ठरणार आहे.

एमपीएससी, युपीएससी, आणि तत्सम स्पर्धा परिक्षांकरीता हायटेक ग्रंथालय, ई ग्रंथालय, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, एक-दोन दिवसीय चर्चासत्रे, शिबीरे, नामवंत वक्त्यांची व्याख्याने आदी विधायक आणि स्पर्धा परिक्षांना पुरक ठरणारे उपक्रम याठिकाणी राबविले जाणार आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख