मुंबई : राहूल गांधी यांच्यात देश चालविण्यासाठी लागणारे सातत्य नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एका मुलाखतीवेळी केले होते. त्यानंतर काँग्रेसमधून या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजीचा सूर उमटला. यावर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मानतो पण ते राहूल गांधींना ओळखण्यात चुकले. पुढे सर्व पक्षांनी एकत्रित लढा द्यायचा आहे, त्याचे नेतृत्व राहूल गांधी करतील, असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
श्री. थोरात म्हणाले राहूल गांधी यांनी जीवनात खूप संकट पाहिली, टीका पाहिली आहेत. त्यांचे मनोधैर्य खचविण्याचे काम करतात. पवार साहेब अभ्यास चांगला आहे, पण राहूल गांधींना ओळखण्यात ते चुकले. पक्षात स्वीकार्यता राहूल गांधींना असून ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे.
राहूल गांधी यांनी जीवनात जे काही दुःख पाहिले आहे. जे त्यांच्यावर आघात झाले, त्यातूनही ते उभे राहून नेतृत्व करत आहेत. यापुढेही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत. ते करत असलेला कामाच्या विरोधात भाजपची यंत्रणा प्रचार करत आहे. राहूल गांधी हे अतिशय यशस्वीपणे पुढची वाटचाल करणार आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे.
शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. परंतू राहूल गांधींना समजून घेण्यात ते कमी पडले, असे वाटते. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विधानाचे समर्थन केले. त्यांनी केलेले वक्तव्य हे काँग्रेस पक्षाचे मत असल्याचे ही त्यांनी नमुद केले.

