"गोकुळ' चे राजकारण : आजच्या तमाशापेक्षा कालचा गोंधळ बरा - Politics of "Gokul": Heal yesterday's confusion over today's spectacle | Politics Marathi News - Sarkarnama

  "गोकुळ' चे राजकारण : आजच्या तमाशापेक्षा कालचा गोंधळ बरा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

र जिल्ह्यातील सुमारे पाच लाख उत्पादकांची रोजीरोटी अवलंबून आहे. राज्यातील इतर सहकारी संघाची सद्याची स्थिती बघितली तर राजकारणातून "गोकुळ' चेही तसे होणार नाही ना ? याचीही काळजी सर्वांनी घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) वर्चस्व मिळवण्यासाठी नेत्यांत सुरू झालेल्या वादात संघाला प्रामाणिकपणे आणि काबाडकष्ट करून दूध पुरवठा करणारा उत्पादक मात्र दुर्लक्षित होत आहे. दोन वर्षापुर्वी झालेल्या "गोकुळ' च्या सभेत प्रचंड राडा झाला, त्याचीच पुनरावृत्ती कमी-अधिक प्रमाणात आजच्या सभेत झाली. संघाच्या सत्तारूढ नेत्यांनी सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्या, असे सांगून उपस्थित संचालक आणि सभाध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम गोंधळात झाला. 

तर गेल्या वर्षीच्या सभेबाबत प्रश्‍न विचारणाऱ्यांनी वर्षभरात -- ही सभा झाली का, त्यात काय ठराव झाले, त्याला सुचक, अनुमोदक कोण होते, ही माहिती कायद्याने मिळू शकत असताना त्यावर आताच प्रश्‍न विचारण्याचे कारण नव्हते. जर मागची सभा झाली असेल तर सत्तारूढ संचालकांनीही त्याचे इतिवृत्त वाचण्याची गरज होती.

संस्था कोणतीही असो त्यात सत्ता ज्यांची त्यांच्याकडून वार्षिक सभेचे इतिवृत्त असो किवा त्या सभेचा कोरम हा निश्‍चित केला जातो. अनेक साखर कारखाने आणि नेत्याचे चर्चस्व असलेल्या संस्थांत हीच स्थिती असताना केवळ गोंधळ घालायचा हाच उद्देश आजच्या सभेत होता का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुध उत्पादकांना आता हा व्यवसाय परवडत नाही. नवी पिढी तर या व्यवसायाकडे यायला तयार नाही. हा व्यवसाय परवडेल कसा, त्याकडे नवी पिढी कशी आकर्षित होईल, याकडे दोन्ही गटांकडून दुर्लक्षच केले जाते.

त्याऐवजी दुधाचे टॅंकर किती कोणाचे, कमिशन कोण खाते, नोकरभरतीत किती गैरव्यवहार झाला, यावरच चर्चा होताना दिसते. यावर अंकुश असलाच पाहिजे. संस्थेत असला कारभार चालयलाच नको. त्याचा जाबही विचारला पाहिजे पण तो विचारत असताना उत्पादकांच्या प्रश्‍नांकडे तितकेच महत्त्व दिले पाहिजे. उत्पादनकांना दुधाला चार पैसे वाढवून मिळावेत, ते वेळेत मिळावे, पशुखाद्याचे दर कमी व्हावेत, इतर सुविधाही वेळेत मिळाव्यात या उत्पादकांच्या माफक अपेक्षा, पण याचसाठी काम करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही त्यावर पाणी फिरवल्याचे दोन्हीही सभांवरून स्पष्ट होते.

जास्तीत जास्त आणि चांगल्या प्रतीचे दूध संघाला घालणाऱ्या उत्पादकांचा सभेत होणारा सत्कारही आता बंद झाला आहे. हा सत्कार तरी व्हावा ही उत्पादकांची अपेक्षाही सभेतील गोंधळामुळे फोल ठरत आहे. सलग दोन सभांत झालेल्या गोंधळामुळे "गोकुळ'च्या निवडणुकीत दोन्ही गटातील चुरस काय असू शकते, याची प्रचिती आली आहे. या निवडणुकीत कोण कोणासोबत असेल यावरच निकालाचे गणित अवलंबून आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताधारी विरूध्द जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र झाले.

त्यात दोन जागा जिंकून विरोधकांनी संघात चंचु प्रवेश मिळवला. पण त्यांच्या एका संचालकांचे निधन झाले आणि दुसरे संचालक सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर कधी बसले, हेही विरोधी नेत्यांनाही कळाले नाही. गेल्या सभेला उपस्थित असलेला विरोध गटाचा एकही नेता आजच्या सभेला आला नव्हता.  सत्ताधारी गटाचे दोन ज्येष्ठ संचालकही नाराज आहेत, अशा परिस्थितीत विरोधी कार्यकर्त्यांनी खिंड लढवली असली तरी भविष्यात विरोधकांना हेच वातावरण ठेवण्याचे आव्हान असेल.

या संपूर्ण वर्चस्व वादात राज्यात आणि देशातही एक नंबरवर असलेल्या "गोकुळ"ची प्रतिमा आणि लौकिक जपण्याचेही आव्हान दोघांसमोर असेल. कारण, हा संघ उत्पादकांचा आहे, त्यावर जिल्ह्यातील सुमारे पाच लाख उत्पादकांची रोजीरोटी अवलंबून आहे. राज्यातील इतर सहकारी संघाची सद्याची स्थिती बघितली तर राजकारणातून "गोकुळ' चेही तसे होणार नाही ना ? याचीही काळजी सर्वांनी घेण्याची गरज आहे.

दृष्टिक्षेपात सभा
- उत्पादनकांना दुधाला चार पैसे वाढवून मिळावेत,या त्यांच्या अपेक्षेवर सत्ताधारी, विरोधकांकडूनही पाणी
- जास्तीत जास्त, चांगल्या प्रतीचे दूध घालणाऱ्या उत्पादकांचा सभेतील सत्कार बंद
"गोकुळ"ची प्रतिमा, लौकिक जपण्याचे सत्ताधारी व विरोधकांपुढे आव्हान 
जिल्ह्यातील पाच लाख उत्पादकांची रोजीरोटी "गोकूळ'वर अवलंबून

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख