मोठी बातमी : अखेर नारायण राणे यांचा जामीन मंजूर

राणेंचा अटकपूर्व जामीन रत्नागिरीतील सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतरपोलिसांनी अखेर राणेंना दुपारी अटक केली होती.
मोठी बातमी : अखेर नारायण राणे यांचा जामीन मंजूर
Narayan Rane

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाड येथील न्यायालयानं जामीन दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पोलिसांनी राणेंना मंगळवारी दुपारी अटक केली होती. त्यानंतर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्ष व राणेंच्या बाजूने युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं राणेंचा जामीन मंजूर केला. (Narayan Rane gets Bail in controvercial comment case)

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. राणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलले आहेत, वक्तव्यामागे त्यांचा काही कट होता का, याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली. राणे हे जबाबदार व्यक्ती आहेत मग ते बेजाबाबदारपणे का वागले?, असा मुद्दाही त्यांनी मांडला. 

तर राणे यांचं वक्तव्य राजकीय स्वरूपाचं आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे चुकीची असल्याने त्यांना जामीन द्यावा, असा युक्तीवाद राणे यांच्या वकिलांनी केला. अटक करण्यापूर्वी त्यांना कुठलीही नोटीस देण्यात आली नाही. त्यांच्या वक्तव्यामागे कोणतंही षडयंत्र नव्हतं. पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे. खोटी कलमं लावण्यात आली आहेत. त्यांची अटक बेकायदेशीर आहे, असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. तसेच राणेंच्या प्रकृतीची माहितीही वकिलांनी न्यायालयाला दिली. सुमारे पाऊन तास दोन्ही बाजूचा युक्तीवाद सुरू होता. त्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाने केली मागणी फेटाळून लावत जामीन मंजूर केला.

दरम्यान राणेंना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु, उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळातच राणेंना अटक करण्यात आली.

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वरमधील गोळवली गावात पोलीस दाखल झाले होती. पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी सुरू केली. राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथकही दाखल झाले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना अटक करुन पोलीस घेऊन गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत गाडीत भाजपचे आमदार प्रसाद लाडही होते.

आत्तापर्यंच राणेवर तीन ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहे. आतापर्यंत महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रुभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाडमध्ये भादंवि कलम 153, 189, 504, 505 (2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईत नारायण राणेंच्या जुहू येथील घरासमोर आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने पोलिसांनी सैाम्य लाठीमार केला. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे. ही दगडफेक भाजपने केली असल्याचा आरोप युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे.  मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in