दोन्ही मोहित्यांच्या फक्त बैठकाच; एकत्रिकरणाचे कोडे सुटेना.... - Just meetings of both Mohites; The puzzle of integration is not solved .... | Politics Marathi News - Sarkarnama

दोन्ही मोहित्यांच्या फक्त बैठकाच; एकत्रिकरणाचे कोडे सुटेना....

सचिन शिंदे 
मंगळवार, 25 मे 2021

या कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकांची परंपरा 1989 पासून आजअखेर कायम आहे. 2009 मध्ये मोहिते-भोसले यांचे मनोमिलन संघर्षाला पूर्णविराम ठरेल, असे वाटत असताना अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. 2015 मधील तिरंगी लढतीत डॉ. भोसले सत्तेत आले. यंदाही या निवडणुकीला वेगळी धार निश्‍चित असणार आहे. 

कऱ्हाड : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Krishna Sugar Factory) निवडणुकीत अविनाश मोहिते (Avinash Mohite) व डॉ. इंद्रजित मोहिते (Dr. Indrajit Mohite) यांच्या गटांच्या एकत्रिकरणाबाबत अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, निवडणूक जाहीर झाली, तरी त्यात अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी, याबाबत सभासदांत उत्सुकता आहे. दुसरीकडे पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या मुद्यांवर भोसले गट सभासदांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. Just meetings of both Mohites; The puzzle of integration is not solved ....
 
सातारा, सांगली जिल्ह्यांच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक अखेर जाहीर झाली. कारखान्यात सध्या डॉ. सुरेश भोसले यांच्या गटाची सत्ता आहे. त्या काळात केलेल्या कामाचे फ्लेक्‍स त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावागावांत लावले आहेत. अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रिकरणाचे काय होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. निवडणूक अद्याप पक्षीय पातळीवर गेलेली नाही. 

हेही वाचा : कृष्णा कारखान्यासाठी 29 जूनला मतदान,  उद्यापासून अर्ज भरण्यास सुरवात

मात्र, राष्ट्रवादी व कॉंग्रेसने ती नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. दोन्ही मोहितेंच्या केवळ बैठकाच सुरू आहेत. या कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकांची परंपरा 1989 पासून आजअखेर कायम आहे. 2009 मध्ये मोहिते-भोसले यांचे मनोमिलन संघर्षाला पूर्णविराम ठरेल, असे वाटत असताना अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. 2015 मधील तिरंगी लढतीत डॉ. भोसले सत्तेत आले. यंदाही या निवडणुकीला वेगळी धार निश्‍चित असणार आहे. 

आवश्य वाचा : सर्व अधिकार आपल्यालाच आहेत, असे पवार समजत असतील तर तो उपसमितीचा अपमान...

कृष्णा कारखान्यात भोसले गटाने नेहमीच विकासाची परंपरा कायम ठेवली आहे. याही वेळी सत्तेत असताना विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मोठ्या ताकदीने निवडणुकांना सामोरे जाऊ. तशी तयारीही केली आहे. विकास हाच खरा अजेंडा आहे. त्याशिवाय विरोधकांचे एकत्रिकरण नक्की कसे असेल, त्यावरही आमची पुढची रणनीती ठरेल. 

-अतुल भोसले, नेते, सहकार पॅनेल 

सभासदांवर पूर्ण विश्‍वास आहे. 2010 मध्ये सभासदांनी ज्या विश्‍वासाने साथ दिली, तोच विश्‍वास 2015 मध्येही होता. मात्र, काही कारणाने सत्ता आली नाही. आजही सभासद आमच्यासोबत आहेत. दोन्ही मोहिते गटांनी एकत्र यावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर एकत्रिकरणाची चर्चा सुरू आहे. ती सफल होईल किंवा नाही, हे चर्चेवर अवलंबून आहे. 

- अविनाश मोहिते, नेते, संस्थापक पॅनेल 

 

 

कृष्णा कारखान्यातील सभासदांची मालकी धोक्‍यात आली आहे. त्यामुळे त्यांचा मालकी हक्क कायम राहावा, यासाठी सभासदांची बाजू घेऊन "कृष्णा'च्या रणांगणात रयत पॅनेलतर्फे निवडणूक लढवत आहोत. समविचारी लोकांशी युतीचा विषय डोक्‍यात नाही. मात्र, निवडणुकीसाठी महत्त्वाचे असेल ते आम्ही करत आहोत. त्यामुळे एकत्रिकरणाचाही पर्याय अवलंबणार आहोत. त्यादृष्टीने अविनाश मोहितेंशी चर्चा सुरू आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल. 

- डॉ. इंद्रजित मोहिते, नेते, रयत पॅनेल 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख