तटकरे - जाधव संघर्षाची धार महाविकास आघाडीमुळे झाली कमी - The edge of the conflict between Tatkare and Jadhav was lessened due to the Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

तटकरे - जाधव संघर्षाची धार महाविकास आघाडीमुळे झाली कमी

मुझफ्फर खान  
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

भास्कर जाधव आमदार असले तरी शिवसेनेत त्यांना अपेक्षित असलेले स्थान मिळालेले नाही. त्यामुळे जाधवांना डीवचण्याची संधी तटकरेंच्या हाती होती. परंतू जाधवांना अंगावर न घेतलेलेच बरे अशी भूमिका तटकरेंनी घेतली.

चिपळूण : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी मंत्री भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. त्यानंतर माजी आमदार रमेश कदम राष्ट्रवादीत सक्रीय झाले. या घडामोडीनंतर खासदार तटकरे विरूद्ध आमदार भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होईल, असे वाटले होते. परंतू राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने कोकणच्या या दोन नेत्यांमधील संघर्षाची धार कमी केली आहे. दोघांनी एकमेकांच्या विरोधात बोलायचे नाही, असे ठरवल्याचे सध्यातरी दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यावर पंधरा वर्षे तटकरेंचे एकहाती वर्चस्व होते. आघाडी सरकारमध्ये जाधवांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तटकरेंनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वाटेत सोडून जाधवांच्या विरोधात मोहीम उघडली.

जाधवांचा स्वभाव आक्रमक आहे. एखादी गोष्ट पटली नाही, तर ते उघडपणे व्यक्त करतात. सुनील तटकरे मात्र, शांत आणि मुरब्बी स्वभावाचे आहेत. ते शत्रूच्या विरोधात स्वतः मैदानात न उतरता कार्यकर्त्यांचा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापर करतात. पार्टी मिटींग आणि जाहिर कार्यक्रमात भास्कर जाधवांनी अनेकवेळा तटकरेंचा उघडपणे समाचार घेतला आहे.

तुलनेत तटकरे फार कमीवेळा उघडपणे जाधवांच्या वाटेत गेले. तटकरे समर्थक रमेश कदमांची दहा वर्षे संघर्षात गेली. राष्ट्रवादी सोडून त्यांनी शेकाप, भाजप, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले. त्यामुळे पुन्हा एकदा जाधव विरूद्ध तटकरे असा वाद रंगेल असे वाटले होते. परंतू राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीला भाजपबरोबर लढायचे आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी समझोता केल्याचे दिसत आहे.
तुरंबवच्या मंदिरात भास्कर जाधवांनी देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍याला शिवीगाळ करत मारहाण केली होती. तटकरे चिपळूणात आल्यानंतर ते जाधवांच्या या कृतीवर भाष्य करून राजकारण पेटवतील असे सर्वांना वाटले होते. तटकरेंच्या कार्यक्रमाला भास्कर जाधव येतील कि नाही यावरूनही अनेकांना शंका होती.

भास्कर जाधव आमदार असले तरी शिवसेनेत त्यांना अपेक्षित असलेले स्थान मिळालेले नाही. त्यामुळे जाधवांना डीवचण्याची संधी तटकरेंच्या हाती होती. परंतू जाधवांना अंगावर न घेतलेलेच बरे अशी भूमिका तटकरेंनी घेतली. कामथे उपजिल्हा रूग्णालयात ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन प्रणालीच्या शुभारंभप्रसंगी हे दोघे नेते एका व्यासपीठावर आलेच.

त्यांच्यासह आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम आणि महाविकास आघाडीतील इतर नेते एकत्र आले. एकमेकांच्या विरोधात बोलायचे नाही, अशी ग्वाही दोघांनी दिली. त्यामुळे नेत्यांच्या भांडणात एकमेकांना ठस्सन देणारे कार्यकर्तेही सुखावले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख