हमी भावाने सोयाबीनची खरेदी १५ ऑक्टोबरपासून : बाळासाहेब पाटील - Guaranteed purchase of soybeans from October 15 Says NCP Minister Balasaheb Patil | Politics Marathi News - Sarkarnama

हमी भावाने सोयाबीनची खरेदी १५ ऑक्टोबरपासून : बाळासाहेब पाटील

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी एक ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे. त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

मुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी एक ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. 

 श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीनला हमी भाव तीन हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. यावर्षीच्या हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी खरेदी केंद्रे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.

खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी एक ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे. त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकिंत प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा. केंद्र शासनाकडे हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव १८ सप्टेंबरला पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असेही श्री.पाटील यांनी सांगितले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख