तोडणी, वाहतूक खर्चात बचत करून शेतकऱ्यांना जादा ऊस दर द्यावा : बाळासाहेब पाटील - Farmers should be given extra cane rate by saving in harvesting and transportation cost says NCP Minister Balasaheb Patil | Politics Marathi News - Sarkarnama

तोडणी, वाहतूक खर्चात बचत करून शेतकऱ्यांना जादा ऊस दर द्यावा : बाळासाहेब पाटील

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

चालू गळीत हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही त्यादृष्टीने शेती अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना केल्या. पुढील वर्षीच्या हंगामात देखील उसाचे उत्पादन जास्त राहणार असल्याने शेती विभागाने दक्ष राहून कार्यवाही करावी, अशी सूचना श्री. पाटील यांनी केली.

कऱ्हाड : साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक खर्च व कमिशन सर्व कारखान्यांमध्ये समांतर राहिल याकडे लक्ष द्यावे. ऊस तोडणी वाहतूक खर्चात बचत करून शेतकऱ्यांना जास्तीचा दर देता येईल. यासाठी कारखाना व्यवस्थापनात आवश्‍यक ती माहिती द्यावी, अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज शेती अधिकाऱ्यांना केल्या. शेती अधिकाऱ्यांनी कारखान्यांसंदर्भात मांडलेल्या प्रश्नांवर शासन निश्‍चित विचार करेल, त्यासाठी आवश्‍यक प्रस्ताव सादर करावा, असेही सूचित केले. 

सहकारमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील साखर आयुक्तालयात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील चालू गाळप हंगामाबाबत साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. आयुक्तालयाचे प्रशासन संचालक उत्तम इंदलकर, विकास सहसंचालक पांडुरंग शेळके, उपपदार्थ सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले व साखर आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री पाटील यांनी यंत्राद्वारे ऊस तोडणी, अंगद गाडी, बायडिंग मटेरियल, ऊस तोडणी व वाहतूक खर्च, मुकादम कमिशन या मुद्यांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी शेती अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक खर्च व कमिशन सर्व कारखान्यांमध्ये समांतर राहील याकडे लक्ष द्यावे. अडचणी व प्रश्न कारखाना व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्यावेत.

ऊस तोडणी वाहतूक खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळावा, यासाठी कारखाना व्यवस्थापनात आवश्‍यक ती माहिती वेळोवेळी द्यावी.  चालू गळीत हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही त्यादृष्टीने शेती अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना केल्या. पुढील वर्षीच्या हंगामात देखील उसाचे उत्पादन जास्त राहणार असल्याने शेती विभागाने दक्ष राहून कार्यवाही करावी, असे सांगून शेती अधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांशी संबंधित मांडलेल्या प्रश्नांवर शासन निश्‍चित विचार करेल, त्यासाठी आवश्‍यक प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी यावेळी शेती अधिकाऱ्यांना सूचित केले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख