उदयनराजेंच्या पराभवाच्या आनंदापेक्षा शिंदे पडल्याचे दु:ख राष्ट्रवादीच्या जिव्हारी

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उदयनराजे आणि महेश शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. याच सभेत उदयनराजे यांनी जरंडेश्‍वर कारखान्याच्या खासगीकरणाचा मुद्दा पुढे आणून राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदार शशिकांत शिंदेंवर टीका केली होती. निवडणुकीचा निकाल लागताच जरंडेश्‍वर कारखाना डॉ. शालिनीताई पाटील यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सभेत सांगितले होते.
MLA Mahesh Shinde, Shashikant shinde and MP Udyanraje Bhosale
MLA Mahesh Shinde, Shashikant shinde and MP Udyanraje Bhosale

सातारा : गेल्यावर्षी आजचा दिवस कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी काळा दिवस ठरला. खासदार शरद पवारांना दिलेला शब्द पाळत उदयनराजेंचा पराभव करण्यात राष्ट्रवादीची फौज व्यस्त राहिली. तर विरोधात नवखा उमेदवार असल्याने शशिकांत शिंदे हॅटट्रीक करणार या अविरभावात गाफिल राहिलेली राष्ट्रवादीची मंडळी लक्षात घेऊन महेश शिंदेंनी शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मदतीने आमदार शिंदेंवर नाराज असलेल्यांना फिरविले. तेथेच राष्ट्रवादीच्या हातातील कोरेगावचा बालेकिल्ला सुटला.

शशिकांत शिंदेंच्या पराभवामुळे उदयनराजेंच्या पराभवाचा आनंदही राष्ट्रवादीच्या नेत्यांना गेल्यावर्षी आजच्या दिवशी साजरा करता आला नाही. गड आला अन्‌ सिंह गेला.. अशी समजूत काढत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिंदेंच्या पराभवाची सल मनातच ठेऊन राहिले आहेत. 

24 ऑक्‍टोबर 2019 या दिवशी संपूर्ण देशाचे लक्ष सातारा जिल्ह्याच्या निकालाकडे लागले होते. कारण उदयनराजेंना चार महिन्यात पुन्हा खासदार करण्याचे आव्हान भाजपने स्वीकारले होते. मोदी, शहा, फडणवीस यांची विभागीय सभा उदयनराजेंसाठी साताऱ्यात झाली होती. तर दुसरीकडे साताऱ्यात एकच सांगता सभा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत धो पावसात झाली होती. यासभेत श्री. पवार यांनी चुकीची दुरूस्ती करण्याचे आवाहन सातारकरांना केले होते. त्यामुळे शरद पवारांचा शब्द साताऱ्यात काय जादू करतोय, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत कोरेगाव मतदारसंघात मात्र, वेगळ्याच हालचाली सुरू होत्या.

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन पंचवार्षिक कोरेगाव मतदारसंघातून आमदार झाल्याने यावेळेस ते हॅटट्रीक करणार असा दावा कार्यकर्ते करत होते. तसेच त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून नवाखा उमेदवार म्हणून महेश शिंदे यांना उरविले होते. महेश शिंदे यांची राष्ट्रवादीकडून ''पोस्टर बॉय'' म्हणून खिल्ली उडविली जात होती. त्याचा बदला घेण्याची तयारी श्री. शिंदे यांनी वर्षभरापासून सुरू ठेवली होती. याची कोणतीही कानकुण राष्ट्रवादीच्या नेत्यांना नव्हती. अनुभवी व राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद यांचा विजय निश्‍चित होणार या अविरभावात राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते राहिले होते. 

अन्‌ महेश शिंदेंचे लिड तुटलेच नाही...

मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातीला शशिकांत शिंदे पाचशे, हजाराने आघाडीवर होते. पण खटाव भागातील मतमोजणी सुरू झाली आणि ते 1200 ते 1500 मतांनी मागे पडले. महेश शिंदेंनी आघाडी घेतली. 27 व्या फेरीअखेर महेश शिंदे यांनी 1624 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर सातारा विभागाच्या मतमोजणीत आकडा कमी जास्त होत होता. पण महेश शिंदेंनी घेतलेले लिड काही तुटले नाही. साताऱ्याने तारण्याचा प्रयत्न केला पण कोरेगाव, खटावने आधीच वजाबाकी केली होती. अखेर महेश शिंदे यांनी 6232 मतांनी आघाडी घेत विजय मिळविला. महेश शिंदे यांना एक लाख एक हजार 487 मते तर शशिकांत शिंदे यांना 95 हजार 255 मते मिळाली होती. 

जल्लोष करत कार्यकर्ते साताऱ्यात आले.... 
महेश शिंदेंनी मतमोजणीत आघाडी घेतल्याचे समजताच कोरेगावात जल्लोष सुरू झाला. महेश शिंदे यांचे कार्यकर्ते कोरेगावातून जल्लोष करत साताऱ्यातील वखार महामंडळाच्या गोदामात सुरू असलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेमका कोण शिंदे आघाडीवर हे न समजल्याने त्यांनीही जल्लोषाची तयारी केली होती. पण अखेर त्यांना महेश शिंदे आघाडीवर असल्याचे समजल्यावर त्यांची नाराजी झाली. महेश शिंदे मतमोजणी केंद्रात दाखल झाले. त्यांच्या अंगावर गुलाल असल्याने त्यांना मतमोजणी केंद्राच्या बाहेरच पोलिसांनी थांबविले होते. तर बाहेरच्या गेटवर त्यांचे समर्थक गुलालाची उधळण करत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना शशिकांत शिंदेंचा पराभवाने धक्का बसला होता. 

समर्थकांसह शशिकांत शिंदेही गाफिल राहिले... 
कोरेगाव मतदारसंघात वर्षभरापासून महेश शिंदे यांनी तयारी सुरू ठेवली होती. त्यांनी अनेकदा आपण केलेल्या कामाचे पोस्टर विविध ठिकाणी लावले होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शशिकांत शिंदे यांनी त्यांना गांभीर्याने न घेता त्यांची पोस्टर बॉय म्हणून शिल्ली उडविली. तर दुसरीकडे आमदार शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थकही आमचे साहेब काही झाले तरी 20 ते 25 हजार मतांनी निवडुन येणारच असा दावा करत होते. अगदी पुसेगाव येथील राष्ट्रवादीच्या सांगता सभेवेळीही खुद्द शशिकांत शिंदे यांनाही काही झाले तरी मी 20 हजारांनी का होईना निवडुन येणारच असा दावा केला होता. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच होती. महेश शिंदेंनी सर्व नाराजांना एकत्र करून आमदार शिंदेंचा बालेकिल्ला पोखरला होता. याबाबतही आमदार शिंदे व त्यांचे समर्थक गाफिल राहिले. 

भिशी ग्रुपने कामच केले... 
निष्टावंतांना सन्मान हवा, गेली 20 वर्षे बाहेरचे नेतृत्व कोरेगावकरांनी सोसले, आता विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार हवा, असा अजेंडा घेऊन एकत्रित आलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांनी भिशी ग्रुपच्या माध्यमातून दबाव गट तयार केला होता. याचे नेतृत्व सुनील खत्री करत होते. या ग्रुपने सुरवातीपासून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. या ग्रुपमध्ये शरद पवार यांना मानणारे, शालिनीताई पाटील यांच्या गटाचे तसेच माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी वर्षभरापासून भिशी ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक गटातील नाराजांचे एकत्रिकरण करण्यात आले होते. यामध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते जोडले गेले होते. त्यांचाही करिष्मा महत्वाचा ठरला. या भिशी ग्रुपची समजूत काढण्याकडे शशिकांत शिंदेंनी दुर्लक्ष केले होते. 

ठाकरेंची सभा, शालिनीताईंचे पत्र अन्‌ उदयनराजेंची टीका... 
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उदयनराजे आणि महेश शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. याच सभेत उदयनराजे यांनी जरंडेश्‍वर कारखान्याच्या खासगीकरणाचा मुद्दा पुढे आणून राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदार शशिकांत शिंदेंवर टीका केली होती. निवडणुकीचा निकाल लागताच जरंडेश्‍वर कारखाना डॉ. शालिनीताई पाटील यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सभेत सांगितले होते. महत्वाचे म्हणजे याच सभेत डॉ. शालिनीताई पाटील यांच्या युतीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्याबाबतच्या पत्राचे वाचन करण्यात आले होते. तसेच उदयनराजेंनी पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर उदयनराजे व त्यांच्या समर्थकांनी कोरेगाव मतदारसंघात थोडे अधिक लक्ष घातले होते. त्याचाही शिंदेंच्या पराभवात वाटा राहिला आहे. 

पवारांनी आनंदोत्सव टाळला... 
एकीकडे उदयनराजे यांचा पराभव झाल्याचा आनंद राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना होता तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांच्या पराभव जिव्हारी लागला होता. त्यातही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी सभा घेण्याचा निर्णय घेतला. श्री. पवार यांनी विजयी सभेसाठी साताऱ्यात यायचे ठरविले. पण तोपर्यंत त्यांच्या स्वीय सहाय्यकाने त्यांना शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे, असे सांगितले. त्यामुळे श्री. पवार यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाय तर मी साताऱ्याला विजयी सभेसाठी येणार नाही, असे सांगून आनंदोत्सव टाळला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com