रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारी टोळी पकडली; ८०० चे इंजेक्शन विकत होते ११ व १५ हजार रुपयांना 
Remadesivir's black-marketing gang was caught

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारी टोळी पकडली; ८०० चे इंजेक्शन विकत होते ११ व १५ हजार रुपयांना 

पुणे महापालिकेच्या बाणेर येथील कोरोना सेंटरमधून ही इंजेक्शन घेऊन ती मूळ किंमतीच्या १४ ते १९ पटीत ही टोळी बेकायदेशीरपणे विकत होती. कोरोना अहवाल आणि या इंजेक्शनचे प्रिस्क्रीप्शन असलेल्यांनाच ती विकली जातात. मात्र, ही टोळी अवाच्या सव्वा पैसे घेऊन ती कुणालाही विकत होती.

पिंपरी : कोरोनावरील ८०० रुपयांचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन काळ्या बाजारात ११ व १५ हजार रुपयांना विकणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने पकडले आहे. या टोळीत दोन वैद्यकीय कर्मचारी (ब्रदर्स) आहेत. त्यातील एक पुणे महापालिकेच्या बाणेर येथील कोरोना सेंटरमधील,तर दुसरा पुण्यातीलच औंध येथील एका खासगी रुग्णालयातील आहे. या टोळीकडून पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली. 

पुणे महापालिकेच्या बाणेर येथील कोरोना सेंटरमधून ही इंजेक्शन घेऊन ती मूळ किंमतीच्या १४ ते १९ पटीत ही टोळी बेकायदेशीरपणे विकत होती. कोरोना अहवाल आणि या इंजेक्शनचे प्रिस्क्रीप्शन असलेल्यांनाच ती विकली जातात. मात्र, ही टोळी अवाच्या सव्वा पैसे घेऊन ती कुणालाही विकत होती. दोनच दिवसांपूर्वी कृष्णप्रकाश यांनी आपला मोबाईल नंबर जाहीर करून अवैध धंद्याविरुद्ध तक्रार करा,कारवाई निश्चीत केली जाईल, असे सांगितले होते. त्याचा प्रत्यय लगेचच आला.

कारण या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची खबर थेट पोलिस आय़ुक्तांनाच काल (ता.९) मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून ही टोळी जेरबंद करण्यात आली. प्रथम आदित्य दिगंबर मैदर्गी याला सांगवी येथे ट्रॅप केले गेले. पोलिसच बनावट गिऱ्हाईक बनून त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याने दोन इंजेक्शन २२ हजार रुपयांना देणार असल्याचे सांगितले. त्याच्या दोन इंजेक्शनसह मुसक्या आवळताच त्याने ती आपल्याला तळेगाव दाभाडे येथील प्रताप सुनील जाधवरने दिल्याचे कबूल केले.

एक इंजेक्शन मिळून आलेल्या प्रतापला पकडताच त्याने आपल्याला ती आपण औंध येथील खासगी रुग्णालयातील अजय गुरुदेव मोराळे (ब्रदर्स) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यावर मोराळेची उचलबांगडी पोलिसांनी केली. त्याने ती बाणेरच्या कोरोना सेंटरमधील कर्मचारी (ब्रदर)मुरलीधर सुभाष मारटकर याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न होताच त्याचाही धरपकड करण्यात आली.पिंपरी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे व त्यांचे पथक आणि एफडीएचे अधिकारी विवेक खेडकर आणि भाग्यश्री यादव यांनी ही मोहिम फत्ते केली.

सध्या शहरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा असल्याने त्याचा मोठा काळाबाजार सुरु आहे. तसेच ते वेळेत मिळाल्याने काही रुग्णांचा जीवही गेलेला आहे. हा काळाबाजार ही गंभीर बाब असल्याचे सांगून त्यावर कार्यवाही करण्याचा आदेश शहराचे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी नुकताच (ता. ७) पालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिला होता. तर, त्याच दिवशी उपमहापौर हिराबाई ऊर्फ नानी घुले यांनीही ही मागणी प्रशासनाकडे केली होती. तर, त्याअगोदर एकच दिवस खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांनीही आयुक्तांची भेट घेऊन रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखा, असे सुचविले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने नाही,पण पोलिसांनी तातडीने दखलच घेतली नाही, तर कारवाईही केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in