पिंपरी : पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराला आज राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्याने पिंपरी चिंचवडकरांचे पूर्ण मेट्रोचे स्वप्न पहिल्याच टप्प्यात साकार होणार आहे. यामुळे स्वारगेट ते पिंपरी मेट्रो आता आणखी पुढे साडेचार किलोमीटर धावणार आहे.
दरम्यान, पिंपरी-निगडीनंतर नाशिकफाटा ते चाकण अशा मेट्रोचीही मागणी पुढे आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पाचा डीपीआर बदलण्याचे काम सुरु झाले आहे. नंतर तो केंद्र व राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.मात्र,हा मार्ग दुसऱ्या टप्यात होण्याची शक्यता आहे.या मार्गावर निओ मेट्रोसारखी लाईट मेट्रो चालवण्याचा विचार सुरू आहे.
पिंपरीपर्यंतच्या मेट्रोने पिंपरी चिंचवड शहराचा निम्मा भाग सुद्धा कव्हर होत नव्हता. त्यामुळे पिंपरी पालिकेने व सर्वच राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी ती शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे निगडीपर्यंत नेण्याची मागणी केली होती. एवढेच नाही, तर त्याचा खर्च उचलण्याची तयारी पालिकेने दाखवली होती. त्यामुळे या मेट्रोचे काम करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने डीपीआरमध्ये केंद्र सरकारच्या सुचनेनुसार बदल करून तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली.
या अतिरिक्त मार्गिकेसाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार आहे.त्यात राज्य शासनाचा एकूण ७९ कोटी ४ लाख तसेच ९० कोटी ६३ लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज असे एकूण १७० कोटी ३ लाख असा सहभाग असेल. तर, एकूण खर्चाच्या दहा टक्के केंद्र सरकार खर्च करणार आहे. कर्जाच्या स्वरुपात देखील निधी उभारण्यात येणार आहे.या मार्गिकेची
लांबी ४.४१ कि.मी. इतकी असून यात ३ स्थानके आहेत. निगडी ते स्वारगेट मार्गावर २०२३ मध्ये ४.९५ लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होईल असा अंदाज आहे.

