आमदार लक्ष्मणभाऊ जगताप म्हणतात , हा तर मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार - MLA Laxmanrao Jagtap was angry at the private ambulance driver | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप म्हणतात , हा तर मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असतानाही, काही घटक,मात्र  रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची किंवा नातेवाईकांची आर्थिक लूट करण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खासगी रुग्णवाहिकांचा समावेश आहे. ते कोरोना रूग्णाला रुग्णालयांमध्ये किंवा विविध डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तसेच कोरोनाने मरण पावलेल्याला स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांचे कुटुंबिय किंवा नातेवाईकांची लूट करीत आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने मरण पावलेल्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून मोठी आर्थिक लूट सुरु असून ते तासाला एक ते तीन हजार रुपये घेत आहेत. हे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही ही त्याहून गंभीर बाब आहे, अशी संतप्त टीका पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज केली. 

मृतांचे कुटुंबिय किंवा नातेवाईक दुःखात असल्यामुळे ते आपली होणारी ही आर्थिक लूट गपगुमान सहन करत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. त्यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णवाहिका त्याब्यात घेऊन त्यांचे संचलन करण्याची सूचना जगताप यांनी पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा आऱटीओंना पत्र देऊन केली.त्यामुळे मृताचे कुटुंबिय व नातेवाईकांना दिलासा मिळेल,असे ते म्हणाले.

आऱटीओला दिलेल्या पत्रात जगताप म्हणतात, ''शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असतानाही, काही घटक,मात्र  रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची किंवा नातेवाईकांची आर्थिक लूट करण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खासगी रुग्णवाहिकांचा समावेश आहे. ते कोरोना रूग्णाला रुग्णालयांमध्ये किंवा विविध डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तसेच कोरोनाने मरण पावलेल्याला स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांचे कुटुंबिय किंवा नातेवाईकांची लूट करीत आहेत.

त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. ते तासाला एक ते तीन हजार रुपये आकारतात. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावले जात असल्याने स्मशानभूमीत चार ते पाच तास प्रतिक्षा करावी लागते आहे. त्यामुळे मृताचे कुटुंबिय रुग्णवाहिकेला तासाला एक हजार रुपयेप्रमाणे चार ते पाच हजार रुपये, तर तीन हजार रुपये याप्रमाणे १२ ते १५ हजार रुपये मोजत आहेत. ही आर्थिक लूट थांबणे गरजेचे आहे. शहरातील खासदार, आमदार यांच्यामार्फत देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे संचलन आऱटीओमार्फत केले जाते. त्याच धर्तीवर शहरातील सर्व खासगी रूग्णवाहिकाचेही करण्याची गरज आहे.''

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख