माथाडीच्या बैठकीस आलेले ते दोन गुंड कोण... - Who are the two goons who came to Mathadi's meeting ... | Politics Marathi News - Sarkarnama

माथाडीच्या बैठकीस आलेले ते दोन गुंड कोण...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचे किंवा त्यामध्ये वाढ करायची हा प्रश्न राज्याच्या अखत्यारित आहे. महाविकास आघाडीचे मराठा नेते अशोक चव्हाण मात्र, मराठा समाजाची दिशाभूल करत असून ते लोकांना सांगतता १०२ वी घटना दुरूस्तीच्या माध्यमातून दिलेले आरक्षण चुकीचे आहे.

सातारा : माथाडीमध्ये गुंडगिरी वाढली असून मध्यंतरी एका बैठकीवेळी दोन नावाजलेले गुंड आले होते. यासंदर्भात मी महामंडळाचा अध्यक्ष असताना याबाबत सीपींकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, तक्रार करून दीड दोन वर्षे झाली तरी यावर कोणतीच कारवाई पोलिस करत नाहीत. माथाडीमधील या गुंडाना पोलिसच संरक्षण देत आहेत, असा आरोप माजी आमदार व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. 

माथाडी नेते कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, मी राजकिय माणूस नाही. पण माथाडीमध्ये गुंडगिरी फार वाढली आहे. दोन नावाजलेले गुंड माथाडीच्या बैठकीत आले होते.

याबाबत मी महामंडळाचा अध्यक्ष असताना सीपींकडे लेखी तक्रार केली होती, असे सांगून नरेंद्र पाटील म्हणाले, हे पत्र देऊन दीड दोन वर्षे झाले. तरी यावर कोणतीच कारवाई पोलिसांनी केलेली नाही. माथाडीमध्ये या गुंडांना पोलिसच
संरक्षण देत आहेत, असा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला. तसेच शंभर कोटींबाबत बोलण्याएवढी माझी उंची नसून मी शंभर टक्के राजकिय व्यक्ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नरेंद्र पाटील म्हणाले, १०२ वी घटना दुरूस्तीच्या माध्यमातून फडणवीसांनी चुकीच्या पध्दतीने मराठा आरक्षण दिल्याची टीका महाविकास आघाडीचे मंत्री करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात केस सुरू असताना महाअभियोक्तांनी १०२ वी घटना दुरूस्ती ही केंद्रातील आरक्षणासाठी आहे, असे सांगितले होते.

एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचे किंवा त्यामध्ये वाढ करायची हा प्रश्न राज्याच्या अखत्यारित आहे. महाविकास आघाडीचे मराठा नेते अशोक चव्हाण मात्र, मराठा समाजाची दिशाभूल करत असून ते लोकांना सांगतता १०२ वी घटना दुरूस्तीच्या माध्यमातून दिलेले आरक्षण चुकीचे आहे.

पण आता दूध का दूध व पाणी का पाणी झाले आहे. फडणवीस सरकारने जे एससीबीसीचे आरक्षण दिले ते योग्य असून ते टिकले पाहिजे. त्यावर महाविकास आघाडीचे सरकार काय करतात तेच आम्हाला पहायचे आहे. ते आरक्षण टिकवितात की आणखी काही खोडसळपणा करतात ते बघायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख