उपऱ्यांना पावन करून घेणाऱ्यांनी शिवसेनेचा इतिहास अभ्यासावा : प्रतिक कर्पेंचा सरदेसाईंना टोला

उपऱ्यांना राज्यसभेची तिकिटे देण्याबद्दलही शिवसेना जगात प्रसिद्ध आहे. अगदी `केनिया`तून आलेल्यांना तिकिट मिळाले पण व्हिडियोकॉनचा रिकामा खोका हाती घेऊन शिवसेनेतील मूळ भूमिपुत्र बसले धुणी `धूत`, ही उदाहरणेही सगळ्यांना ठाऊक आहेत, असेही कर्पे यांनी दाखवून दिले आहे.
उपऱ्यांना पावन करून घेणाऱ्यांनी शिवसेनेचा इतिहास अभ्यासावा : प्रतिक कर्पेंचा सरदेसाईंना टोला
Those who sanctify strangers should study the history of Shivsena: Prateek Karpe lashes out at Sardesai

मुंबई : स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उर्मिला मातोंडकरांपासून ते सत्तारांपर्यंत उपऱ्यांना पावन करून घेणाऱ्या शिवसेनेच्या इतिहासाचा नीट अभ्यास करावा आणि त्यानंतरच दुसऱ्यांच्या घरांवर दगडे मारावित, असा टोला मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे यांनी युवासेनेच्या वरुण सरदेसाई यांना लगावला आहे. 

भाजपच्या मूळ नेत्यांमध्ये शिवसेनेचा सामना करण्याची धमक नाही, म्हणून उपऱ्यांना पुढे केले जात आहे. या उपऱ्यांकडे पाहिल्यावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कोठे गेले, असा प्रश्न पडत असल्याचा टोमणा सरदेसाई यांनी भाजपला लगावला होता. त्यास कर्पे यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे. 

मुळात शिवसेनेच्या नवनेतृत्वाने सत्तेसाठी अनैसर्गिक युती करून कै. बाळासाहेबांची आयुष्यभराची तत्वे आणि संस्कार धुळीला मिळविली आहेत, त्याचे काय ते आधी बोला, असाही टोला त्यांनी लगावला आहे. भाजपमधील उपऱ्यांवर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षात काय झाले होते ते तपासून पहावे. ठाण्याच्या प्रताप सरनाईकांपासून ते उर्मिला मातोंडकर आणि अब्दुल सत्तारांपर्यंत शिवसेनेतील उपऱ्यांचा प्रवास आहे. यात चिल्लर-खुर्दा किती आला गेला त्याची गणतीच करता येणार नाही. 

अशाच उपऱ्यांना राज्यसभेची तिकिटे देण्याबद्दलही शिवसेना जगात प्रसिद्ध आहे. अगदी `केनिया`तून आलेल्यांना तिकिट मिळाले पण व्हिडियोकॉनचा रिकामा खोका हाती घेऊन शिवसेनेतील मूळ भूमिपुत्र बसले धुणी `धूत`, ही उदाहरणेही सगळ्यांना ठाऊक आहेत, असेही कर्पे यांनी दाखवून दिले आहे. एकीकडे कै. बाळासाहेबांनी केव्हाही सैनिक-पोलिस यांचा अपमान केला नाही. 

तर अगदी कालपरवा रस्त्यावर आंदोलनात कायद्याच्या रक्षकांचा माताभगिनींवरून उद्धार करणारे युवानेते दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सर्वांनी पाहिले आहेत. अशा अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या बालबुद्धीच्या व्यक्तींनी दुसऱ्यांचे संस्कार काढू नयेत हेच उत्तम. अर्थात युवानेते आदित्य ठाकरेंच्या नव्या नेतृत्वाखालील नवी शिवसेना हीच असेल तर गोष्ट वेगळी. पण मग काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडे मारायची नसतात, एवढे तरी ध्यानात ठेवावे, असेही कर्पे यांनी सुनावले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in