मुख्यमंत्र्यांना आणि काॅंग्रेसच्या पाटील यांना शरद पवारांनी याची पूर्वकल्पना दिली होती... - sharad pawar had informed to CM and congress leader Patil about Modi meet | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना आणि काॅंग्रेसच्या पाटील यांना शरद पवारांनी याची पूर्वकल्पना दिली होती...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 जुलै 2021

महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचा दावा करण्यात आला... 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे घेतलेली भेट पुर्वनियोजित होती. तसेच या भेटीची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांना होती अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (NCP clarifies about PM Modi and Sharad Pawar meet)

या भेटीवरून उठलेल्या राजकीय वादळावर राष्ट्रवादीने सविस्तर निवेदन दिले. तसेच महाविकास आघाडी सरकार राज्यात पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा निर्वाळा मलिक यांनी या वेळी दिला. भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचे मलिक यांनी या वेळी आवर्जून स्पष्ट केले. 

बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टमध्ये बदल करण्यात आला असून तो सहकारी बँकांसाठी धोकादायक आहे. याबाबत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करु असे नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर आज प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी केला.  

वाचा ही बातमी : पवार गेले नरेंद्र मोदींच्या भेटीला...
बँकिंग रेग्युलेटरी कायद्यात नवीन बदल केल्याने जे लोक बँकांकडून कर्ज घेतील, त्यांना बँकेचे अडीच टक्के शेअर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कर्ज परत केल्यानंतर हे शेअर कुणालाही विकण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला देण्यात आला आहे असे आदेश रिझर्व्ह बँकेने काढले आहेत. यापुर्वी हे शेअर बँकेलाच पुन्हा देण्याचा नियम होता. मात्र अशापद्धतीने खुल्या बाजारात शेअर विकल्यास सहकारी बँक धनाढ्य लोकांच्या हातात जाण्याची भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली.  रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा येत आहे तसेच त्यांचा व्याजदरही अबाधित राहत नाहीत अशाप्रकारचे लेखी निवेदनातून शरद पवारसाहेबांनी हे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले. या चर्चेतून केंद्रसरकार सकारात्मक विचार करेल असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.  

पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर शुक्रवारी आणखी दोन बैठका झाल्या त्याबद्दलची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात झाली त्याबद्दल पियुष गोयल यांनी स्वतः शरद पवारसाहेबांची त्यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना भेटण्याची परंपरा आहे. सभागृहात सर्व पक्षांचे सहकार्य मिळण्यासाठी अशा भेटी होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभागृहातील कामकाजात सहकार्य करेल अशी चर्चा यावेळी दोघांमध्ये झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.  तसेच देशाचे सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दालनात एक बैठक झाली. या बैठकीला माजी संरक्षणमंत्री म्हणून शरद पवारसाहेब उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सरंक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि लष्करातील प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. देशाच्या सीमेवरील परिस्थितीचे आकलन उपस्थितांना करुन देण्यात आले. त्यानंतर राजनाथसिंह यांनी माजी सरंक्षणमंत्री म्हणून शरद पवारसाहेबांच्या अनुभवाचा विचार करता काही सूचनाही घेतल्या. या तीन बैठकांखेरीज इतर कोणाबरोबरही आदरणीय पवारसाहेबांची बैठक झालेली नाही. माध्यमात ज्या काही उलटसुलट बातम्या येत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ अशा विषयांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख