मुख्यमंत्र्यांना वेळच नाही...नरेंद्र पाटील शिवसेना सोडण्याच्या तयारीत..... - Chief Minister has no time ... Narendra Patil is preparing to leave the shivsena..... | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना वेळच नाही...नरेंद्र पाटील शिवसेना सोडण्याच्या तयारीत.....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

माझे बोलणे केवळ फक्त  एकनाथ शिंदे यांच्याशी होते. त्यामुळे मलाही वाटते आपण अलिप्त राहिलेले बरे. त्यांनाही टीका टिपणी नको सामान्य शिवसैनिकांनाही नाराजी नको, तर नेत्यांना फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता आहे. काय करायचे काय नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे.  

सातारा : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिलेले नाही. माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना आदेश देणे गरजेचे होते. पण माथाडीच्या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे कमीपणा येत असेल तर मी अलिप्त राहिलेले बरे, असेही त्यांनी स्पष्ट करत शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. 

मुंबईत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर माथाडीच्या प्रश्नांबाबत वर्षा किंवा सह्याद्री अतिथीगृहात बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती. पण ती झाली नाही. त्यानंतर कोविडच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मला एपीएमसी मार्केट सुरू करा, असे फोन करून सांगितले होते. त्यानुसार आम्ही एपीएमसी मार्केट सुरू केले. त्यानंतर माथाडी कामगारांचा अत्यावश्यक मध्ये समावेश करून घ्या, असे सांगितले पण त्यांना वेळ भेटला नाही. पण माथाडीच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांनी कधी वेळच दिला नाही. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे. 

माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना त्यांनी आदेश देणे गरजेचे होते. पण माथाडीच्या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी आहे.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले की माझ्यावर शिवसेनेचे नरेंद्र पाटील अशी टीका होते. लोकसभेच्या निवडणूकीत शिवसेनेत का गेलो याचे कारण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे.

निवडणूकीच्या नंतर महाभकास आघाडीचे सरकार आले. मी केवळ हिंदूत्वाच्या विचारावर शिवसेनेत गेलो. राष्ट्रवादीने माझा कमीपणा केला नव्हता की अपमान केला नव्हता. पण त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडीची कामे हाती घेतली होती. त्याच्या बोलण्यावरून मी खासदारकीची निवडणूक लढविली. 

उदयनराजे भोसले यांची अचानक महामार्गावर भेट झाल्यानंतर शिवसेनेचे नरेंद्र पाटील असा उल्लेख आवर्जून केला जातो. त्यावेळी काही शिवसैनिकांनी फोन करून साहेब असे काही करू नका, असे सांगितले. छत्रपतींना भेटलो हा माझा वैयक्तिक विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो हा माझा वैयक्तिक विषय आहे. याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे का कमीपणा यावा, असा प्रश्न करून शिवसेनेच्या नेत्यांचा माझा जास्त संबंध येत नाही. माझे बोलणे केवळ फक्त  एकनाथ शिंदे यांच्याशी होते. त्यामुळे मलाही वाटते आपण अलिप्त राहिलेले बरे. त्यांनाही टीका टिपणी नको सामान्य शिवसैनिकांनाही नाराजी नको, तर नेत्यांना फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता आहे. काय करायचे काय नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे पाटील म्हणाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख