भिवंडीत भरपावसात भाजपचे घंटानाद आंदोलन - BJP's bell ringing agitation outside 45 temples in Bhiwandi | Politics Marathi News - Sarkarnama

भिवंडीत भरपावसात भाजपचे घंटानाद आंदोलन

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

मंदिरे ही सकारात्मक ऊर्जा देणारी आस्थेची ठिकाणे असून शासन विविध उद्योग व्यवसायांना काहीअटीं वर सुरू करण्यास परवानगी देते. मग मंदिर उघडण्यास परवानगी का देत नाही, असा सवाल खासदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला. 

भिवंडी : लॉकडाउन शिथिल केल्यानंतर अनेक उद्योग व्यवसायासह मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, मंदिर मशीद सहअन्य धार्मिक स्थळ उघडण्यास बंदी कायम ठेवल्याने आज खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, शहरध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी भरपावसात भिवंडी भाजप शाखेच्यावतीने शहर व ग्रामीण भागातील विविध सुमारे 45  मंदिरांबाहेर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करून घंटानाद आंदोलन केले.

महाआघाडी सरकार राज्यात मद्य विक्रीला परवानगी देते. मॉल उघडायला परवानगी देते, परंतु जनतेची आस्था असणारे मंदिर उघडण्यास परवानगी देत नाही त्याचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात आला. येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करून भक्तांसाठी मंदिर उघडे करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. मग जेल झाली तरी बेहत्तर, असा इशारा संतोष शेट्टी, नगरसेवक सुमित पाटील यांनी दिला.

मंदिरे ही सकारात्मक ऊर्जा देणारी आस्थेची ठिकाणे असून शासन विविध उद्योग व्यवसायांना काहीअटीं वर सुरू करण्यास परवानगी देते. मग मंदिर उघडण्यास परवानगी का देत नाही, असा सवाल खासदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला.  गणपती मंदिर, स्वामी नारायण मंदिर, स्वामी अय्यपा, जैन मंदिर, जबडेश्वर शंकर मंदिर, मार्कंडेय महामुनी मंदिर, हनुमान मंदिर, नीलकंठ मंदिर, साईबाबा मंदिर या ठिकाणी आंदोलने करण्यात आली.

विविध ठिकाणी झालेल्या घंटानाद व मंदिरा बाहेर टाळ वाजवीत भजन व आरती करत झालेल्या आंदोलनात आमदार महेश चौघुले, नगरसेवक सुमित पाटील, यशवंत टावरे, शरद धूळे, निलेश चौधरी, जिल्हा परिषद सदस्य देवेंश पाटील, राम माळी, युवा अध्यक्ष परेश चौघुले, सुधीर कोंडलेकर, कल्पना शर्मा, अविनाश सिकची यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मंदिराचे विश्वस्त, पुजारी सहभागी झाले होते.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख