फडणविसांच्या खुर्चीला दणका देणाऱ्या पावसातील त्या ऐतिहासिक सभेची वर्षपूर्ती - Anniversary of that historic meeting in Satara that changed the political winds | Politics Marathi News - Sarkarnama

फडणविसांच्या खुर्चीला दणका देणाऱ्या पावसातील त्या ऐतिहासिक सभेची वर्षपूर्ती

उमेश बांबरे 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

या सभेला उद्या (रविवारी १८ ऑक्टोबर) एक वर्षे पूर्ण होत आहे. या सभेच्या आठवणी प्रत्येक सातारकराच्या मनात आजही घर करून राहिलेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर आपल्या घरात शरद पवारांचा धो पावसातील भाषण करतानाचा फोटो फ्रेम करून लावला आहे. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण साताऱ्यात फ्लेक्‍स लावून आठवणींना उजाळा देण्याची तयारी केली आहे. 

सातारा : विधानसभा व सातारा लोकसभेची पोटनिवडणुक गेल्यावर्षी एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीची सांगता सभा झाली. ही सभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धो.. पाऊस असूनही यशस्वी केली. धो.. पावसात भिजत शरद पवार यांनी सातारकरांना साद घातली. मी मागील वेळी केलेली चूक यावेळी सातारच्या जनतेने दुरूस्त करावी, अशी विनंती केली. पवारांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी राष्ट्रवादीचा उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. भाजपकडून लढणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादीकडून सातारा शहरात फ्लेक्‍सबाजीच्या माध्यमातून या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची दिग्गज मंडळी भाजपच्या वाटेवर गेली. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभा निवडणुक लढून विजयी झालेले उदयनराजे भोसले यांनीही विधानसभेच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यातही भाजपचेच सरकार पुन्हा येईल, सत्तेतील पक्षासोबत राहिल्यास मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल तसेच मंत्रीपदही मिळेल या आशेने सातारा जिल्ह्यातून खासदार उदयनराजे भोसले व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोण वाचविणार असा प्रश्‍न उपस्थित झाला.

अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या 80 वर्षाच्या योद्ध्याने संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र पिंजून काढला. `अजून मी म्हातारा झालेलो नाही,` असे म्हणत पायाला भिंगरी लावून प्रचारात आघाडी घेतली. एकीकडे भाजपकडून नरेंद्र मोदींपासून अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून केवळ एकच शरद पवार अशात प्रचाराचा धुरळा उडाला.

यामध्ये सर्वाला कलाटणी देणारी ठरली ती साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची धो पावसातील सांगता सभा. जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या या सभेकडे समस्त सातारकरांचे लक्ष लागले होते. या सभेपूर्वी साताऱ्यात मोदी, शहा यांच्या सभा झालेल्या होत्या. साताऱ्यातील सांगता सभेत धो धो पाऊस पडत असतानाही शरद पवार काय इशारा करणार हे पहाण्यासाठी व ऐकण्यासाठी भर पावसात सातारकर जिल्हा परिषदेच्या मैदानावर थांबून होते. ही सभा होणार की नाही, अशी स्थिती होती. पवार भाषणाला उभे राहिले आणि पावसाचा जोर आणखी वाढला. पण पवारांनी आपले भाषण थांबवले नाही. पावसाचे तुफान आणि पवारांची टोलेबाजी दोन्ही एकाच वेळी सुरू होती. समोरच्या जनतेने पावसाला न जुमानता पवारांच्या भाषणाला प्रचंड असा प्रतिसाद दिला. पवार पावसात भिजत आहेत, हे पाहून उमेदवार व त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील हे त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले. या दोन मित्रांचा त्या सभेतील तो भिजतानाचा फोटो आजही सोशल मिडियात धुमाकूळ घालतो आहे.

श्री. पवार यांनी भाषण थोडक्यात पण समर्पक केले. ``मागील वेळी माझ्याकडून एक चूक झाली आहे. ही चTक या निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त करावी, असे आवाहन केले. या आवाहनाला कोण आला रे कोण आला...राष्ट्रवादीचा वाघ आला...अशा घोषणा देत समस्त सातारकरांनी दाद दिली. श्री. पवारांनी केलेली `चूक` विधानसभेसोबत झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त केली.  भाजपकडून निवडणुक लढणारे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीतून साताऱ्याचे खासदार झाले.

या सभेला उद्या (रविवारी १८ ऑक्टोबर) एक वर्षे पूर्ण होत आहे. या सभेच्या आठवणी प्रत्येक सातारकराच्या मनात आजही घर करून राहिलेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर आपल्या घरात शरद पवारांचा धो पावसातील भाषण करतानाचा फोटो फ्रेम करून लावला आहे. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण साताऱ्यात फ्लेक्‍स लावून आठवणींना उजाळा देण्याची तयारी केली आहे. 

या सभेनंतर राज्यातील राजकीय माहोल पालटला. राष्ट्रवादी या निवडणुकीत निचांकी कामगिरी बजावणार, असे भाकीत केले जात होते. प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची लाट आली. पवारांचे बालेकिल्ले पुन्हा पवारांकडे राहिले. सत्ता समीकरणातील आकड्यांची पुन्हा जुळवाजुळव करण्याची वेळ भाजपवर आली. त्यांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. शिवसेनेच्याही हक्काच्या जागा गेल्या. निकालानंतर पवारांनी आणखी सूत्रे फिरवली. मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथविधीची तयारी करणारे फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. त्यांचा दुसऱ्यांदा शपथविधी झाला खरा. पण  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ती पावसातील सभा आठवत होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील अजित पवार यांचे बंडही कार्यकर्त्यांच्या जोमापुढे टिकले नाही. म्हणूनच ती सभा ऐतिहासिक ठरली.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख