तुम्ही दुर्गा आहात, पोलिस दलाची शक्ती आहात : अनिल देशमुख - you are durga and you are the power of the police force said anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्ही दुर्गा आहात, पोलिस दलाची शक्ती आहात : अनिल देशमुख

अतुल मेहेरे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

तुम्हाला तुमचे कार्य पार पाडत असताना अनेक वेळा दोन भूमिका पार पाडाव्या लागतात. जेव्हा तुम्ही समाजातील असंख्य कुटुंबीयांची काळजी घेत असता, तेव्हाच तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची देखील काळजी घ्यावी लागते. तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या खूप सक्षमतेने पार पाडता हे आम्ही अनुभवतो आहोत.

नागपूर : आज नवरात्रीचा नववा दिवस आहे. घराघरांत गृहिणी पूजापाठ आणि विजयादशमीची तयारी करीत आहेत, पण पोलिस दलात कार्यरत महिला अधिकारी आणि कर्मचारी आजच्या दिवशीही कर्तव्य बजावत आहेत. उद्या दसऱ्याच्या दिवशीही त्यांची ड्युटी कुठे ना कुठे लागलेली आहेच. आजही दीक्षाभूमी परिसरात शेकडो महिला पोलिस कर्तव्यावर आहेत. पोलिस दलातील सर्व महिलांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘तुम्ही दुर्गा आहात’, असे म्हणत पत्रातून शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपल्या पत्रात गृहमंत्री देशमुख म्हणतात, ‘सर्वप्रथम, मी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना येणारे वर्ष सुख, शांती, समृद्ध व निरोगी जावो, अशा शुभेच्छा देतो. आज नवरात्रीचा नववा दिवस आहे, तो दिवस ज्या दिवशी वाइटावर चांगल्याचा विजय झाला. याच दिवशी दुर्गा मातेने दानव महिषासुराला पराभूत करून जगाचे रक्षण केले. जशी दुर्गामाता संकटाच्या काळी जनतेच्या रक्षणासाठी धावून येते, त्याचप्रमाणे समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या तुम्ही देखील पोलिस दलाच्या दुर्गा आहात. तुम्ही सर्वांचे रक्षण करण्यासाठी नेहमी सज्ज असता, विशेषतः: कोविडच्या काळात समाजाचे रक्षण करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची महत्वाची जबाबदारी तुम्ही अतिशय जिकरीने पार पाडली ती निश्चितच कौतुकास्पद आहे. 

तुम्हाला तुमचे कार्य पार पाडत असताना अनेक वेळा दोन भूमिका पार पाडाव्या लागतात. जेव्हा तुम्ही समाजातील असंख्य कुटुंबीयांची काळजी घेत असता, तेव्हाच तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची देखील काळजी घ्यावी लागते. तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या खूप सक्षमतेने पार पाडता हे आम्ही अनुभवतो आहोत. तुम्ही कठोर परिश्रम व अथक प्रयत्न करून राज्याची व राज्याच्या जनतेची जी सेवा करीत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. दुर्गामाता या जगाची शक्ती म्हणून ओळखली जाते आणि तुम्ही देखील दुर्गारुपाने ह्या पोलिस दलाच्या शक्ती आहात, हे वारंवार आपल्या कर्तव्यनिष्ठेतून दिसून आले आहे.

पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून या राज्यासाठी तुम्ही करत असलेल्या सेवेबद्दल आमच्या सर्वांतर्फे तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. या राज्याची व राज्यातील लोकांची तुम्ही केलेली सेवा, त्यासाठी तुम्ही केलेले अव्याहत प्रयत्न आणि त्यागभावनेने आपण जे आपले आयुष्य जनतेसाठी समर्पित केले, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद ॥’

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः पोलिस दलातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्यामुळे त्यांच्यात आनंद आहे. यामुळे त्यांचा उत्साह निश्‍चितच वाढणार आहे. भविष्यात अधिक सरस कामगिरी करण्यासाठी या पत्रातून त्यांना निश्‍चित ऊर्जा मिळणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख