हिवाळी अधिवेशन होणार की नाही? सल्लागार समितीच्या बैठकीत घेणार निर्णय ! - will there be a winter session or not decision to be taken in the meeting of the advisory committee | Politics Marathi News - Sarkarnama

हिवाळी अधिवेशन होणार की नाही? सल्लागार समितीच्या बैठकीत घेणार निर्णय !

निलेश डोये
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

विधिमंडळ समिती शुक्रवारी ६ नोव्हेंबरला नागपूर येणार असून, अधिवेशनाच्या तयारीबाबत आढावा घेणार आहे. यात विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हे इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. 

नागपूर : दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा होणार की नाही, यावर बराच खल सुरू आहे. कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन न घेता त्यावर होणार खर्च कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वापरावा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. एकंदरीतच हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट आहे. पण राज्याच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. परंतु नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनास अनेकांनी विरोध दर्शविला आहे. अधिवेशनावरील खर्च आरोग्यावर करण्याचे निवेदन दक्षिण नागपूरचे कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना दिले. काही मंत्रीही अधिवेशनासाठी इच्छुक नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले अधिवेशन घेण्यासाठी आग्रही आहेत. शासनाकडून निवास वाटप समिती गठित करण्याव्यतिरिक्त अद्याप दुसऱ्या सूचना देण्‍यात आल्या नाही. यंदा विधानभवन वगळता इतर कोणत्याही इमारतीवर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विधिमंडळ इमारतीवर पाच कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. शासनाकडून स्पष्ट सूचना नसल्याने पहिल्या टप्प्यात फक्त सिव्हिल कामच करण्यात येणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनावरून शासन स्तरावरच संभ्रम आहे. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अधिवेशनासाठी संपूर्ण मंत्रालय नागपूरला हलवावे लागते. संपूर्ण मंत्रालय पाठवावे किंवा त्यात कपात करावी. ऑनलाईनरीत्या काही कामकाज करणे शक्य होईल की नाही, याचाही विचार सुरू आहे. दोन आठवड्यांत कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. तोपर्यंत कोरोनाचा प्रकोप किती वाढतो, कमी होतो, यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. या सर्व गोष्टींची चाचपणी करूनच निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. 

सहा नोव्हेंबरला आढावा बैठक 
विधिमंडळ समिती शुक्रवारी ६ नोव्हेंबरला नागपूर येणार असून, अधिवेशनाच्या तयारीबाबत आढावा घेणार आहे. यात विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हे इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.        (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख